Press "Enter" to skip to content

शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे ः महापौर नितीन पाटील


पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी आज पनवेल शहरातील पनवेल एज्युकेशन सोसायटी पनवेल यांच्यामार्फत आयोजित 10 वी व 12 वी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन पाटील, परिमंडळ 3 च्या पोलीस उपायुक्त डॉ.रश्मी नांदेडकर, पनवेल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन इक्बाल काझी, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, मा.नगरसेवक मुकीत काझी, जुबेर पटेल, आलम पटेल, जाकीया काझी, असिफ करेल, नाविद पटेल, असीम पटेल, माझ मुल्ला, शाहनवाज पटेल, जुबेर पिट्टू, जब्बार पटेल, फय्याज दानवे, मा.नगरसेविका जैनाब शेख, सपोनि बजरंग राजपूत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पनवेल शहर, तळोजा व बारापाडा या ठिकाणी पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या एकूण 3 शाळा असून जवळपास 4 हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. यातील 10 वी व 12 वी मध्ये 90टक्के च्या वर गुण पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काझी यांनी तिन्ही शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थीनीस 1 लाख रुपये रोख बक्षिस दिले. तसेच इतर विद्यार्थ्यांना रोख रक्कम, शालेपयोगी वस्तू आदींचे वाटप त्यांच्या खर्चाने करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर नितीन पाटील यांनी इक्बाल काझी यांच्या मार्फत होत असलेल्या शिक्षणासाठी सढळ हाताने मदतीचे कौतुक केले.

यावेळी महापौर यांनी स्वतःहून शालेय विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी 50 हजाराचा धनादेश दिला. यानिमित्ताने बोलताना परिमंडळ 3 च्या डॉ.रश्मी नांदेडकर यांनी सांगितले की, शिक्षणाचे जीवनात महत्व असून प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. या संस्थेच्या माध्यमातून अल्प फी घेवून तळागळातील मुलांना शिक्षण दिले जाते हे कौतुकास्पद आहे, यासाठी इक्बाल काझी हे दरवर्षी लाखो रुपयाचा निधी या शाळेसाठी स्वतः खर्च करीत आहेत. आगामी काळात या शाळेतून आपल्या देशाचे राष्ट्रपती डॉ.एम.पी.जे.अब्दुल कलाम हे निर्माण झाले पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तर संस्थेचे चेअरमन इक्बाल काझी यांनी मुला-मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे. आज सर्वच क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत हे बघून आनंद होत आहे. या शाळेत सुद्धा टॉपरमध्ये मुलींचेच वर्चस्व आहे. शिक्षणासाठी कोणतीही कमी पडून देणार नाही व या शाळांना चांगल्यात चांगले शिक्षण कसे देता येईल याकडे आपण कायम लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काझी यांचा वाढदिवस असल्याने सर्वांच्या उपस्थितीत केक कापण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉ ही योजना राबवून त्यांना शालेपयोगी वस्तूंसह बॅग, शुज व आयफोन, सायकल भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.