Press "Enter" to skip to content

सौ. रेणुका मयुरेश नेतकर यांनी केले आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रभाग १४ पनवेलमध्ये भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज दिनांक २१ जून रोजी पनवेल को-ऑप. सोसायटीच्या पनवेल जिमखाना, ५२ बंगला, पनवेल येथे सकाळी ७ ते ८ या वेळेत भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भारताने संपूर्ण जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी असून योगाच्या माध्यमातून शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. नियमित योगाभ्यासाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात योग शिक्षिका सौ. पूर्वी झा यांनी उपस्थित नागरिकांना योगासन, प्राणायाम व विविध योग प्रकारांचे प्रत्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिक योगाभ्यासाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वीर वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. अर्चना परेश ठाकूर, लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या स्नुषा सौ. मनिषा अतुल पाटील, उद्योजक व थोर समाजसेवक मा. श्री. इकबाल काझी साहेब, मा. सौ. पूनमताई ठाकूर, प्रभाग अध्यक्ष मा. श्री. गणेश म्हात्रे, भाजपा पनवेल ओबीसी अध्यक्ष मा. श्री. सतिश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी नागरिकांनी कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.

सौ. स्मिता चव्हाण यांनी सांगितले की, “अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योगासाठी आवश्यक सर्व सुविधा, योग मॅट, नाश्त्याची व्यवस्था आणि स्वयंसेवकांची मदत यामुळे संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. अशा प्रकारचे आरोग्यदायी उपक्रम नेहमी आयोजित करावेत.”

तसेच श्री. मयूर ठक्कर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आयोजन अतिशय उत्कृष्ट होते. प्रत्येक गोष्टीची योग्य काळजी घेण्यात आली होती. नागरिकांसाठी केलेली व्यवस्था, स्वयंसेवकांचे सहकार्य आणि संपूर्ण नियोजन कौतुकास्पद आहे. असे उपक्रम सातत्याने व्हावेत अशी अपेक्षा आहे.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, नागरिक, कार्यकर्ते व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी मा. श्री. मयुरेश नेतकर (जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी तसेच मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य) यांनी सांगितले की, “योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा मार्ग आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करावा आणि आरोग्यदायी समाज निर्मितीस हातभार लावावा.”

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक प्रतिसादामुळे हा योग दिन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.