वेडं पान
एक वेडं पान वाऱ्यासोबत उडणारं
भटकत जाऊन दूरवर अलगद कुठंतरी पडणारं
त्याला नव्हती स्वतःची ओळख ना पाळख
नव्हतं त्याला स्वतःच्या रंगाच भान
ना होत त्याला स्वतःच्या भाषेचं ज्ञान
त्याला होतं फक्त ठाऊक इतकंच
कुणीतरी आहे आपल्याला दूरवर नेणारं
कुणीतरी असेल आपलीसुध्दा वाट पाहणारं
एक वेड पान वाऱ्यासोबत उडणारं….
त्याचा रस्ता नेहमी अबोल त्यांच्याशीही न बोलणारा
कुठं जातोय अस विचारलं तरी डोळे वटारून पाहणारा
बापडं विचारेल तरी कुणाला?वेडं सांगेल तरी कुणाला?
त्याला होतं फक्त ठाऊक इतकंच
कुणीतरी आहे आपल्याला दूरवर नेणारं
कुणीतरी असेल आपलीसुद्धा वाट पाहणारं
एक वेड पान वाऱ्यासोबत उडणारं….
एकदा मात्र ते उडत -उडत खूप दूर आलं
वाऱ्याने त्याला रस्त्याच्या कडेला टाकलं
प्रवास करून बिचारं दमून गेलं
आपटून -आदळून पार शिणून गेलं
मातीची उब घेत पोरकं तसच पडून राहीलं
आणि अचानक कुणीतरी रस्त्यावरून तोऱ्यात आलं
त्याच्या वाळलेल्या देहवरून खुशाल चालत गेलं
चर्र असा आवाज आला, देहाच्या त्याच्या चुरा झाला
वेडं पान वाहून आलं खरं जाताना मात्र चटका लावून गेलं
खरच कुणी होत का त्याची वाट पाहणार?
एक वेडं पान वाऱ्यासोबत उडणारं…..
मनोज भागवत, लांजा, रत्नागिरी






Be First to Comment