Press "Enter" to skip to content

‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ ला चालना देण्यासाठी जेएनपीटीमध्ये राबविले जातात विविध प्रकल्प

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ‘पंतप्रधान गती शक्ती’ योजने अंतर्गत जेएनपीटीतील उपक्रमांचा घेतला आढावा

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज ‘पंतप्रधान गति शक्ती राष्ट्रीय योजनेअंतर्गत’ विकासास चालना देण्यासाठी देशातील विविध बंदरांद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ (व्यवसाय सुलभ
करणे) आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी केल्या जात असलेल्या विविध उपायोजनांचा व्यापक आढावा घेतला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री शंतनू ठाकूर, सचिव डॉ संजीव रंजन आणि
सर्व प्रमुख बंदरांचे अध्यक्ष उपस्थितीत होते.

‘पंतप्रधान गति शक्ती राष्ट्रीय योजने’चा उद्देश देशातील सर्वांगीण पायाभूत सुविधांचा पाया रचने असून ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या एकात्मिक विकासाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. बैठकी दरम्यान केंद्रीय मंत्री महोदयांनी देशातील सर्व प्रमुख बंदरांच्या अध्यक्षांना आत्मनिर्भर भारत
मिशन आणि कौशल्य विकासास चालना देण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना मंत्री महोदय म्हणाले, “देशातील प्रमुख बंदरे व अन्य घटकांकडून घेतल्या जात असलेल्या एकात्मिक प्रयत्नांमुळेच देशभरातील विकास कामांना गती प्राप्त होणार आहे. पंतप्रधान गति
शक्ती योजनेमुळे देशातील सामान्य नागरिक, शेतकरी, मासेमारी करणारा समुदाय यांचे जीवनमान ऊंचावण्यास मदत होईल व पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल.

आढावा बैठकी दरम्यान, सचिव डॉ. संजीव रंजन यांनी मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीवर बोलताना पंतप्रधान गति शक्ती योजने अंतर्गत स्मार्ट, मेगा व हरित बंदरे, इज ऑफ डुइंग बिझनेस आणि मेरीटाइम इंडिया व्हिजन 2030 अशा विकासाच्या सात स्तंभांवर प्रकाश टाकला.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील एक प्रमुख कंटेनर बंदर असून याठिकाणी केंद्र सरकारच्या ‘गती शक्ती’ उपक्रमाशी संबंधित अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत जेएनपीटीमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांविषयी माहिती देताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “जेएनपीटीमध्ये कोस्टल बर्थ, अतिरिक्त लिक्विड कार्गो व बंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्राच्या (SEZ) विकासामुळे बंदर आधारित औद्योगिकीकरणात एक नवीन बेंचमार्क तयार होईल. या प्रकल्पांमुळे जागतिक
बाजारपेठांमध्ये प्रवेश व मजबूत मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी तयार होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमांसोबतच, आम्ही करत असलेल्या प्रगत तांत्रिक उपायांमुळे “व्यवसाय सुलभता” वाढेल व उत्पादनास चालना मिळेल तसेच जागतिक व्यापारासाठी जेएनपीटी हे सर्व दृष्टीने उपयुक्त बंदर
बनण्यास मदत मिळेल.”

गती शक्ती योजना पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ व्हिजनचा एक महत्त्वाचा भाग असून ह्या योजनेचा उद्देश्य अखंड कनेक्टिव्हिटी, आर्थिक विकास आणि नागरिकांसाठी सुशासन सुनिश्चित
करणे आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी जेएनपीटी मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, प्रगत तांत्रिक उपायांसह संपूर्ण पारदर्शकता आणि व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाड़ेल.

जेएनपीटीविषयी :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट
म्हणून नावारूपाला आले. सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट, कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल – आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.