शिंडलर कंपनी व तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने नवी मुंबईत ऑक्सिजन प्लांटची उभारणी !
सिटी बेल | नवी मुंबई |
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका सतर्क झालीय.. नव्या विषाणूचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्राला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. भविष्यात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर एकाही रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी नेरुळ, नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे.
भारतातील उद्वाहन (लिफ्ट ) बनविणाऱ्या शिंडलर या कंपनीने तसेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. शिंडलर कंपनीच्या कॉरोपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत तसेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नवी मुंबईतील नागरिकांना या ऑक्सिजन प्लांटची भेट मिळाली आहे. हा ऑक्सिजन प्लांट पीएसए या टेक्नोलॉजी च्या मदतीने बनविला असून दर दिवशी Q A १००० ऑक्सिजन प्लांट मधून रोज ९८ जंबो ऑक्सिजन सिलेंडर भरता येणार आहेत.

या उपक्रमाविषयी बोलताना शिंडलर कंपनीच्या मुख्य पीपल ऑफिसर शीतल शहा म्हणाल्या, “गेल्या दोन वर्षांमध्ये आपण खूपच कठीण परिस्थितीला सामोरे गेलो आहोत ,मुख्यतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. अशी स्थिती पुन्हा येऊ नये म्ह्णून आपण सर्वचजण प्रयत्न करीत आहोत. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा ऑक्सिजन प्लांट उभारून गरजवंतांना एक छोटीशी मदत केली आहे.”
या ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मल्हार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले,” कोरोना महामारीशी लढताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले योगदान दिले आहे. पहिल्या दिवसापासून ते आजच्या क्षणापर्यंत आम्ही ही लढाई लढत आहोत. या लढाईत आता आम्हाला ऑक्सिजन प्लांटची सुविधा उपलब्ध झाली असून नवी मुंबई, ठाणे रायगड येथील गरजवंत नागरिकांना कोरोनाच नाही तर इतर आजारांशी लढताना या ऑक्सिजन प्लांटची मदत होणार आहे. शिंडलर या कंपनीचा मी आभारी असून त्यांनी या लढाईसाठी मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.”













Be First to Comment