Press "Enter" to skip to content

दिवाळीला हिंदूबांधवांनी मशिदीत पढला नमाज

पोलादपूरात कालवली गावातील जामा मशिदीत लक्ष्मीपूजन दिवाळीला हिंदूबांधवांनी पढला नमाज : ६५ वर्षांपासून परंपरा

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

संपूर्ण भारतात हिंदू मुस्लिम ऐक्यासंदर्भात वेगवेगळया घटनांची चर्चा असताना पोलादपूर तालुक्यातील कालवली जामा मशिदीत चक्क ६५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून हिंदूबांधव नित्यनेमाने दरवर्षी न चुकता नमाज अदा करीत असल्याची आश्चर्यजनक परंपरा उघडकीस आली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने यावर्षी या परंपरेची प्रत्यक्ष खात्री केल्याने ही लक्ष्मीपूजन दिवाळीला होणारी नमाज हिंदू मुस्लीम आपसातील सदभावनेचे प्रतीक म्हणून संपूर्ण भारतवर्षात चर्चेत येण्याची आवश्यकता स्पष्ट झाली आहे.

गेल्यावर्षी प्रस्तुत प्रतिनिधीस पोलादपूर तालुक्यातील कालवली जामा मशिदीमध्ये हिंदू बांधवांच्या एका दैवी विचारांचा एक गट दरवर्षी लक्ष्मीपूजन दिवाळीच्याच दिवशी नमाज अदा करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. यामुळे यंदा प्रतिनिधीने या जामा मशिदीमध्ये सकाळी अकरा वाजताच उपस्थित राहून या परंपरेची खातरजमा करण्याचे ठरविले.

चिखलीतील बांदल यांचे काळवलीतील शिष्य गुरूवर्य सदूबाबू पार्टे तथा पार्टे बाबा आणि नानाबाबा वलीले यांच्यातील सख्य कसे झाले याबाबत कोणासही काहीही माहिती नाही. मात्र, नानाबाबा वलिले यांची ही परंपरा आजही कायम ठेवण्यास कालवली ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे. या परंपरेला गुरूशिष्य परंपरा म्हणावे अथवा मैत्री संबंध याबाबतही बुजूर्ग काही सांगू शकत नाहीत. मात्र, जो मंत्र सिध्द करायचा असतो; तो सोनू महमदच्या शाळेमध्ये म्हणजे मशिदीमध्ये नमाज पढूनच सिध्द होईल, असा उल्लेख गुरूवाणीमध्ये असल्याने गेल्या सुमारे ६५ वर्षांहून अधिक काळ याठिकाणी या विचारांच्या तीन तालुक्यांमध्ये विखुरलेल्या हिंदू बांधवांकडून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नमाज अदा केली जाते, असे यावेळी उपस्थित बुजूर्ग हिंदू बांधव आप्पा पार्टे यांनी सांगितले. सध्या गुरूवर्यांच्या सुनबाई असल्याची माहिती यावेळी अधिक विस्तृतपणे बोलण्याचे टाळून या बुजूर्गाने सांगितली.

या पार्टेबाबांच्या शिष्यगणांपैकी भिवा पवार यांनी, काळवली, धारवली, हावरे, सवाद, मोरसडे, निगडे, करंजाडी, रूपवली, बारसगांव, कातिवडे, तुर्भे, तुर्भे खोंडा तसेच सुमारे तीन तालुक्यांमध्ये या शिष्यगणांचे अस्तित्व आहे. दरवर्षी सुमारे 30-35 लोकांचा समुदाय या ऊर्दू सोनू महमद शाळेमध्ये म्हणजेच मशिदीमध्ये नमाज अदा करून एक कोंबडा देतो आणि आमच्या गुरूंच्या काळवलीतील समाधीस्थळी जाऊन मंत्र सिध्द करतो, अशी माहिती दिली. हा शिष्यपरिवार आजार उपचार यापेक्षाही बंदोबस्तासंदर्भात आग्रही असल्याने या मंत्रसिध्दीनंतर अनेक शिष्यमंडळी आजार रोगापासून दूर राहतात, असे मत एका शिष्याने व्यक्त करून वेळप्रसंगी डॉक्टरी इलाज उपचार करण्यासही शिष्य तयार असल्याने यास अंधश्रध्दा म्हणता येणार नाही, असे मत मांडले.

यावेळी कालवली वलीले मोहल्ल्यातील अब्दुलहक खलफे, महमद उस्मान खलफे, मुराद इब्राहिम वलिले, अब्दुर्रज्जाक खलफे, कालवली गावाचे इमाम मौलाना अखलाख यांनी सर्व हिंदू बांधवांचे दरवर्षीप्रमाणे नमाज पठण केल्याबद्दल आनंद व्यक्त करून ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्याहस्ते हिंदूबांधवांना भेटवस्तू प्रदान केल्या.आगामी अनेक पिढयांमध्ये ही परंपरा कायम ठेवण्याची भूमिका यावेळी बुजूर्ग आप्पा पार्टे यांनी मांडली असता वलीले मोहल्यांतील मुस्लीम बांधवांनी जामा मशिदीमध्ये नमाज पढण्यास दरवर्षी स्वागत असल्याचे आवर्जून सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.