आई – वडील संस्कार करण्याचे तर गुरुजन भवितव्य घडविण्याचे काम करतात : अदिती तटकरे
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
गावातील प्राथमिक शाळेत शिकवणारा शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असताना त्या गावासाठीही महत्वाचा असतो. आम्ही त्यावेळी शिक्षणाकडे लक्ष दिले असते आणि शिक्षकांचे ऐकले असते तर आम्ही आणखी वेगळ्या ठिकाणी असतो. माझ्या राजकीय वाटचालीत जिल्हा परिषदेचा टप्पा महत्वाचा आहे. ग्रामीण भागातील शिक्षण अतिशय चांगले आहे. त्याचे सारे श्रेय तुम्हा शिक्षकांना आहे. कोरोना मध्ये शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळेच आज रायगड जिल्हा सुरक्षित आहे. प्रत्येक तालुक्यातील किमान पंधरा शाळा आदर्श शाळा करायच्या आहेत. आई – वडील संस्कार करण्याचे तर गुरुजन भवितव्य घडविण्याचे काम करतात असे महत्वपूर्ण प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने कर्जत मधील शेळके सभागृहात 2020 आणि 2021 सालातील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे पुरस्कार शिक्षकांना देण्यात आले.
“‘कोरोनामुळे गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘ आदर्श शिक्षक पुरस्कार’ सोहळा होऊ शकला नव्हता. त्यामुळे यावेळी दोन्ही वर्षाचे कार्यक्रम आता घेत आहोत. शिक्षकांनी कोविडच्या कालावधीत चांगले काम केले आहे. या काळात ही शिक्षकांनी नेटवर्क नाही तेथील वाडी – वस्तीवर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले.’ असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सांगितले.
यावेळी कर्जत तालुक्यातील समीर येरूणकर, रोहा तालुक्यातील अनुराधा म्हात्रे आणि महाड येथील शिक्षकेतर कर्मचारी अशोक उमरठकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
नारायण डामसे, सहारा कोळंबे, संतोष जंगम, शरद लाड आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील पहिला आय पी एस उत्तीर्ण श्री. प्रतीक जुईकर यांनी, ‘”सत्काराने सकारात्मक ऊर्जा मिळत असते. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. माझा खरा प्रवास आत्तापासून सुरू होत आहे. कर्जत तालुका शैक्षणिक हब होत आहे. त्यामुळे मी दिलेल्या परीक्षा देणारे असतील त्यांना मी सर्वतोपरी सहकार्य करीन’ असा शब्द दिला.”‘
गुणवंत विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांचा सन्मान चिन्ह, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
“‘ शिक्षक पिढी घडवितात त्यामध्ये ते कधीही दुजाभाव करीत नाहीत. कोणतेही संकट आले की शिक्षकांची आठवण येते आणि शिक्षक सुद्धा आपल्या कुटुंबाची पर्वा न करतात दिलेली कामगिरी चोख बजावतात.”‘ असे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना, “‘ शिक्षकांमुळेच आपण घडलो आहोत.”‘ असे सांगितले.
पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना विजय मोरे सोबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे आदी.
यावेळी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी आमदार सुरेश लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपाध्यक्ष सुधाकर घारे, अर्थ व बांधकाम समिती सभापती नीलिमा पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, आस्वाद पाटील , सभापती सुषमा ठाकरे, अनुसया पादिर, प्रतीक जुईकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.













Be First to Comment