Press "Enter" to skip to content

भारतीय संघात महाराष्ट्राच्या सुजन पिळणकर, सुभाष पुजारी, सचिन पाटील ची निवड

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचा 77 खेळाडूंचा जम्बो संघ : येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानला रंगणार “मिस्टर वर्ल्ड”

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |

भारतीय शरीरसौष्ठव जगत आता आगामी 12 व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होतोय. करोनाच्या संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडलेली स्पर्धा येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होत असून या स्पर्धेसाठी भारताचा 77 सदस्यीय चमू निवडण्यात आला असून त्यात महाराष्ट्राच्या सचिन पाटील, सुजन पिळणकर, सुभाष पुजारी सारख्या तयारीतल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

गेल्या वर्षापासून करोना महामारीमुळे 12 वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा अनेकदा पुढे ढकलण्यात आली. दिवसेंदिवस करोनाचे गहिरे होत असलेल्या संकटामुळे गतवर्षीच्या सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता जागतिक शरीरसौष्ठव संघटनेच्या अथक परिश्रमानंतर उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात स्पर्धेची जागतिक दर्जाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

अनंत अडचणींवर मात करीत ही स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या तयारीसाठीही खेळाडूंना फार कमी वेळ मिळाला होता. त्यावेळेतही खेळाडूंना प्रचंड मेहनत घेत स्पर्धेसाठी तयारी करण्याचे धाडस दाखविले. जागतिक स्पर्धेसाठी भारतातून मोठ्या संख्येने खेळाडू तयारी करत असल्याची माहिती भारतीय शरीरसौष्ठव संघटनेच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी दिली.

स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंकता असल्यामुळे काही ओळखीची नावे निवड चाचणी स्पर्धेतून गायब होती. असे असले तरी काही खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावत स्पर्धेच्या तयारीसाठी स्वत:ला झोकून दिल्याचे दिसून आले. त्यात अलिबागच्या सचिन पाटीलचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अवघ्या तीन महिन्यात सचिनने फिटनेस फिजीक गटासाठी स्वत:ला तयार केले आहे. तसेच तो ऍथलिट फिजीक या प्रकारातही आपली पीळदार शरीरयष्टी दाखवणार आहे. त्याचप्रमाणे माजी मुंबई श्री विजेता सुजन पिळणकरही 85 किलो वजनीगटात आपले कसब पणाला लावणार आहे.

स्पर्धेसाठी खेळाडूंना तयारीसाठी अपेक्षित वेळ मिळाला नसला तरी भारताने 77 खेळाडूंसह सर्व गटांसाठी आपल्या दमदार खेळाडूंची निवड केली आहे. पुरूषांच्या आणि महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेबरोबर 40 ते 60 वर्षे वयोगटातील मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेतही भारताचे अनेक दिग्गज आपले नशीब आजमावताना दिसतील.
मि. वर्ल्डसाठी भारताचा संघ पूर्ण तयारीनिशी उतरतोय. शरीरसौष्ठवाच्या मुख्य गटात कुंदन गोपे, रामकृष्ण, इ कार्तिक, समीरं नंदी, मोहम्मद अश्रफ, जावेदअली खान यांच्यासारखे दिग्गज आपले पीळदार देह दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर मास्टर गटात महाराष्ट्राचा सुभाष पुजारी, नामांकित बोरून यमनम, बलदेव कुमार यांच्यासारखे अनुभवी खेळाडूही दिसतील. महिलांच्या गटांमध्ये भाविका प्रधान झरना राय, करिष्मा चानू सुप्रतिक अर्चर्जी यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

त्याचप्रमाणे मॉडेल फिजिक गटात अनिल सती, मनिकंदन, स्वराज सिंग हे भारताचे प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे यंदा भारताच्या जंबो संघाने उज्बेकिस्तान गाजवले तरी आश्चर्य वाटणार नाही.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.