श्रावणगीत
हिरव्या कोमल अनुरागे, धरतीचे स्रवले पान्हे |
श्रावणातल्या जलधारांनी खुलते माझे गाणे ||ध्रु.||
मंगलमय मणिबंध घेउनी, वसुंधरेला अर्पण करूनी
परमानंदे मेघ नाचती पाहुनि रूप सुखाने ||१||
निर्झरिणी पखवाज घुमविती, दिव्य रुपेरी मोती उधळिति
गिरि-कुहरातुनी नर्तन करिती, मोदे गात तराणे ||२||
मधे चमकता रेशिमधारा, नाचे उभवुनि भव्य पिसारा
इंद्रधनूचे स्वागत करितो, मयूर आनंदाने ||३||
शीतल वायू कोठुन आला, मंद धुंद मधुगंध पसरला
त्या श्वासाने मोहित प्राची, उजळे नव तेजाने ||४||
पारिजात हा बहरुन आला, धवल सुमांजलि अर्पि धरेला
तारकाच जणुं उतरुनि आल्या , उधळित स्तुतिसुमने ||५||
कधी गर्जती मेघ धुरंधर, सुवर्णरेखा चमके क्षणभर
मल्हाराचे स्वर निनादता, केले हास्य धरेने ||६||
सुजल सुफल हे रूप मनोहर, जणु अवतरला स्वर्ग धरेवर
चराचरातुन प्रसन्न कण-कण, गाती एकसुराने ||६||
मनोहर काजरेकर, कुडाळ (सिंधुदुर्ग)







Be First to Comment