Press "Enter" to skip to content

शब्दांचा श्रावण

शब्दांचा श्रावण

एक दिवस असा यावा, शब्दांचा पाऊस पडावा
मौनाचे ऊन पडावे, भाषेचा श्रावण यावा
वाक्यांच्या पागोळ्या पडाव्या, म्हणींच्या नद्या वहाव्या
माझ्या मराठी नगरीत भाषेचा सुकाळ व्हावा

वाक्प्रचारांचे इंद्रधनू सजावे, काव्यमेघ बरसावा
अलंकारांची हरळी रुजावी, शब्द-प्रपात कोसळावा
ललीत-निबंधांचे तृण माजावे, उपमांना बहर यावा
माझ्या मराठी नगरीत भाषेचा सुकाळ व्हावा

काव्याची फुले फुलावी, कादंबरींचे पीक यावे
उपमा-उत्प्रेक्षांनी अंगण सुशोभित व्हावे
वेचिता साहित्य फुले ही रसिक धन्य व्हावा
माझ्या मराठी नगरीत भाषेचा सुकाळ व्हावा

अभिजात भाषा आपुली, ती चिरंतन रहावी
मृदगंधाप्रमाणे हवीहवीशी व्हावी
राजभाषेचा मान मायबोलीला मिळावा
माझ्या मराठी नगरीत भाषेचा सुकाळ व्हावा

पौर्णिमा दिक्षित, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.