श्रावणाच्या पावसाने…
श्रावणाच्या पावसाने शांत केले या धरेला
बरसणा-या या सरीने दूर केले काहिलीला
मोहरे मग अंतरंगी साज हिरवा पांघरे ती
आज आनंदात सारी पाखरेही गीत गाती
गंध मातीचा खुणावे आसमंती भारलेला
थेंब पाण्याचा दिसावा शुभ्र मोती माळलेला
सात रंगाच्या कमानी अंबरीही छान सजल्या
तृणफुलांच्या लांब रांगा गात डोलू लागलेल्या
रूप न्यारे हे धरेचे मोहवी सा-या जगाला
मेघ होई अधिर आता या धरेला भेटण्याला
प्रेमधारा बरसती अन वाहती बेधुंद वारे
चिंब ओलेत्या सरींनी तृप्त होते रान सारे
सुजाता कुलकर्णी, आदई







Be First to Comment