स्वप्न वाट
पावसाचा नाद देतो या मनालाही उभारी
साद तेव्हा घालती त्या दूरच्या सांदीकपारी
एक वेडी वाट बघते वाट माझीही कधीची
वाटते बहुदा तिला मी सर करावी रोज माची
तांबड्या रंगात रंगावे असे वाटे मनाला
लाल अलता लागता शृंगार अवघा पूर्ण झाला
का अशी सुस्तावली घालून वळसे डोंगराला
का मिठी ही सैलसर लडिवाळ बापाच्या गळ्याला
हिरवळीविषयी कधी ना अंतरी दुस्वास आहे
खाच खळगे दगड गोटे भाग हा अविभाज्य आहे
ठेच लागावी कुणाला वा कुणी खड्ड्यात जावे
स्वार्थ काही यात नसतो चालणा-याने शिकावे
खंत ना पांथस्थ सारे रोजही तुडवून जाती
लेकराला माफ करते नेहमी ती माय माती
गोड नाते एक आताशा तिच्या माझ्यात आहे
हीच तर स्वप्नातल्या गावातली वहिवाट आहे
निलिमा देशपांडे.







Be First to Comment