आषाढी…
एकतारीचा गजर
फुले भक्तिचा सागर
टाळ चिपळ्यांचा नाद
घाली पांडुरंगा साद
वारी चालते पायांनी
नाही शीण दमणूक
मुखी विठ्ठलाचे नाम
चैतन्याची जपणूक
डोईवर वृंदावनी
नाचे तुळस जोमाने
ताल पायांनी धरला
भेटे विठ्ठल वेगाने
रिंगणात फेर धरी
ज्ञाना तुकोबांचा मान
बैल खिल्लारी सजून
वाढे पालखीची शान
वारकरी संप्रदाय
करी संतांना नमन
शुभ कर्म जागवितो
भागवत एक धर्म
आषाढातला पाऊस
कोसळतो मनसोक्त
पांडुरंगाचे ते प्रेम
एकादशीला आसक्त
पर्जन्याची होता वृष्टी
हलधर सुखावतो
शेता नको उगा बाधा
पांडुरंगा विनवितो
माय मातीच्या उदरी
बी बियाणं अंकुरते
विठ्ठलाचे ते दर्शन
दाण्यामोत्यात डोलते
गाते अभंग नि ओवी
विठू रुक्मिणीची गोडी
सदा कर्तव्यतत्पर
विटेवरी युगे जोडी
पंढरीच्या नगरीत
नमू विठू चरणाला
घडे सार्थक जन्माचे
आषाढ एकादशीला
आठवणींची ही दाटी
क्षणोक्षणी उचंबळे
विठूवरची ती श्रद्धा
अंतर्मना देई बळे
सौ. स्वाती लेले, नवीन पनवेल







Be First to Comment