मोगरा
गंध कोरा मोग-याचा बघ मला स्पर्शून गेला
आठवांच्या कस्तुरीला का उगा उधळून गेला
चोरट्या भेटीत वेडा रोज होता डवरलेला
नेमका कोमेजला तोही निरोपाच्या क्षणाला
कोवळेसे देठ हिरवे पाकळ्यांचा श्वेत तोरा
वेचलेल्या तू कळ्या अन् मी सुगंधाचा पसारा
उधळली होतीस ओंजळ शुभ्र इवल्या चांदण्यांची
सांग वाटावी न असुया का नभाला या सुखाची
नाव नात्याला न होते पेच मोठा हा मनाला
प्रेम होते हे म्हणावे का म्हणावे मैत्र ह्याला
आवडीने मांडलेला खेळ सारा कल्पनेचा
रंगही मग मी दिला त्याला निरागस मोग-याचा
सोडले मी हट्ट सारे लपवल्या सा-या व्यथाही
मांडते शब्दात आताशा तुझ्या माझ्या कथाही
गंध पण सा-या क्षणांचा अजुनही श्वासात आहे
मोग-याच्या ह्या सुगंधाचा अनावर मोह आहे
निलिमा देशपांडे, नवीन पनवेल







Be First to Comment