शब्द
शब्द रंगांच्या रंगी रंगले
शब्द दूरची वाट चालले,
शब्दांचे हळू बोट पकडता
शब्द श्रीहरी सखा भासले.
शब्द तेजस्वी सूर्य जाहले
शब्द गंधाने गंधित झाले,
शब्दांना हळू झोके देता
शब्दांना जणू पंख लाभले.
शब्द वादळी वारा होऊन
कधी गरजले कधी बरसले
शब्द थंडशा गारा होऊन
कधी गोठले कधी थरथरले.
शब्द होऊनी लाटा फुटले
शब्द होऊनी काटा रुतले
शब्दांची हळू फुंकर बसता
शब्द पिसासम तलम भासले.
शब्द बोबडे बोल बोलले
शब्द प्रीतीचे गीत गायले
कर्तव्याचे बोल बोलूनी
शब्द हळू नि:शब्द जाहले.
शब्द सांजेला दिवा होऊनी
देवापुढती हात जोडले,
शब्द रातीला स्वप्नामधुनी
पापणीच्या पल्याड पोचले.
आकाशी चंद्र चांदण्यांसवे
शब्द मंदसे शुभ्र चमकले,
पहाटे अंगणी प्राजक्तासम
शब्द प्रेमाने मुग्ध बरसले.
अपर्णा साठे, नवीन पनवेल







Be First to Comment