पहाट
दवात भिजली, गंधात नाहली
पहाट लाजरी, गालात हसली ll धृ ll
चंद्रकळा काळी, आवरून बाई
कौमुदी घेऊनी , निशा जाई घाई
प्राजक्त फुलला, रांगोळी सजली
पहाट लाजरी, गालात हसली ll १ ll
पक्षिगण सारे, कुंजन करती
भिरभिर नभी, पंख पसरती
पूर्व दिशा कशी, रंगात रंगली
पहाट लाजरी, गालात हसली ll २ ll
जागली अवनी, उजळे आकाश
मंगल प्रभाती, पडला प्रकाश
रविकिरणांनी, कौमुदी फुलली
पहाट लाजरी, गालात हसली ll ३ ll
सौ. विजया चिंचोळी
खारघर, नवी मुंबई







Be First to Comment