सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
उरणमध्ये गेले ४ दिवस लसीकरण बंद असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे. लस कधी उपलब्ध होईल याची माहिती कोणीच अधिकारी देताना दिसत नाही. यामुळे लस कधी येईल याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्याला करोना प्रतिबंधात्मक लशींचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यात वेगाने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला अर्धविराम लागल्याची चिन्हे आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज १०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाचे लक्ष आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा भासू लागल्यामुळे जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.
उरणमध्ये शुक्रवार दि. ३० एप्रिल पर्यंत लसीकरण होते. त्यानंतर १ मे पासून आज ४ मे असे सलग ४ दिवस लस अभावी लसीकरण रखडले आहे. यामुळे ज्यांना दुसरा डोस घ्यावयाचा ते इतर अनेकजण लस कधी येईल याची वाट पहात आहेत. लसीकरण केंद्राच्या बाहेर लस आहे किंवा नाही याचा बोर्ड लावत असल्याने लसीकरणाची माहिती उपलब्ध होते.
याबाबत आरोग्य विभागाचे डॉ. ईटकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यातच लस नसल्याकारणाने उरणमध्ये लसीकरण बंद असल्याची माहिती दिली. जिल्ह्याकडून लस कधी उपलब्ध होईल याची निश्चित अशी माहिती नाही. ज्यावेळी लस उपलब्ध होईल त्यावेळी उरणला लसीकरण सुरू होईल. तोपर्यंत वाट पहावी लागेल असे डॉ. ईटकर यांनी सांगितले.
Be First to Comment