संध्याकाळ…….
सवंगड्यांसह खेळ खेळता श्रमते दमते संध्याकाळ,
थकूनभागून घरी परतते बालपणातील संध्याकाळ.
देवापुढचा दिवा पाहुनी प्रसन्न हसते संध्याकाळ,
संस्कारांचे अन् शिस्तीचे धडे शिकवते संध्याकाळ.
सख्यासोबत्यांसवे मिरविते तरुणपणातील संध्याकाळ,
कधी उद्यानी कधी चौपाटीवरी घुटमळते संध्याकाळ.
पॅटीस भेळ शेवपुरी रगडा; चविष्ट होते संध्याकाळ,
आयुष्याची मजा शिकवते आरस्पानी संध्याकाळ.
कधी चर्चा कधी गप्पा गाणी ऐकून खुलते संध्याकाळ,
वृद्धपणाची काठी टेकत हळू चालते संध्याकाळ.
आठवणींच्या वाती वळता कातर होते संध्याकाळ,
आप्तजनांची वाट पाहते वयस्क होते संध्याकाळ.
कधी घामाच्या गाळून धारा कधी झेलूनी वादळ वारा,
थंडीमध्ये शाल पांघरुन चिडीचूप होते संध्याकाळ.
कधी पन्ह्याचा थंड गारवा; कधी आल्याचा म्हणे चहा हवा,
कधी कडकडीत सूप पिते अलबेली मस्तानी संध्याकाळ.
भूतकाळातील रम्य आठवणी,
वर्तमानी करता उजळणी,
भविष्याची स्वप्ने सुंदर,
नयनी बघते संध्याकाळ
अपर्णा साठे, नवीन पनवेल







Be First to Comment