Press "Enter" to skip to content

महिला दिन साजरा करताय?

महिला दिन साजरा करताय?

तिला आधी जन्माला तर येऊ द्या
तिचे स्त्रीपण जन्माला यायच्या आड येतेय तेवढे फक्त थांबू द्या
मग करा महिला दिन साजरा

शिकताना, वागताना, बोलताना
अगदी हसताना, खाताना सुद्धा
तिला तुमची परवानगी लागते
कशाला करताय महिलादिन साजरा

तिला वस्तू समजून तिची बोली लावता
तिचे तिच्याच लग्नात दान करता
तिला पदरातला जळता निखारा समजता
खरच का करताय महिला दिन साजरा

निर्भयाचा भयकारी आक्रोश अजूनही कानात घुमतोय
साधं रस्त्यावर चालताना, घरात वावरताना
तिला सतत असुरक्षितता जाणवतेय
तरीही तुम्हाला करायचाय महिलादिन साजरा?

आजही तिची किंमत तुमच्या लेखी आहे काय ?
इंच आणि सेंटिमीटर मध्येच तिला मोजताय
उपभोग्य वस्तू म्हणून तिला जोखताय
आणि महिला दिनही साजरा करताय?

तेवढी नाटके करायचे जरा थांबवा
तिला मखरातून खाली उतरवा
आधी तिला माणूस म्हणून वागवा
मग कशाला लागतोय महिला दिन?

काय ते तुमचे तुम्हीच ठरवा..

(महिला दिन साजरा करण्याची वेळच येणार नाही अशा दिवसाची वाट पाहतेय. तोपर्यंत जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!)

डॉ. समिधा गांधी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.