अलवार तुझी चाहूल..
अलवार तुझी चाहूल अशी
मोरपिसारा मनी फुलवते
तनामनावर गोड शिरशिरी
क्षणात अवघी ती बावरते
अवखळ वारा फितूर थोडा
तुझेच गाणे गात वाहतो
तुझ्यासारखा तोही तेंव्हा
अलगद सा-या बटा उधळतो
हळूवार तो स्पर्श जरासा
गालावर मग खळी उमटते
अन मुरलीचे सूर ऐकता
सैरभैरशी राधा भुलते
रंग लेऊन निळ्या नभाचा
अवचित कान्हा साद घालतो
बावरलेल्या या राधेला
सभोवताली तोच भासतो
निळसर गहि-या रंगामध्ये
तीही पुरती भिजून जाते
कृष्ण बनूनी राधा अवघी
धुंद मधुरसे गाणे गाते
सुजाता कुलकर्णी, आदई







Be First to Comment