कविते…
माझ्या पापणीला, कायमचे पाणी
आणि त्यात गाणी, तरंगती !
तरंगत आले, मनावर काही
झाली लाही लाही, आठवांची !
आठवते ओळ, तुझ्या डोळ्यांतली
कवितेत आली, अचानक !
अचानक गेले, बुडून मनात
आत काळोखात, कोमेजले !
कोमेजले हात, लिहिताना ऊन
तुला विस्मरून, कितिकदा !
कितिकदा दूर, फेकले स्वतःला
तुझ्यातल्या मला, वगळून !
वगळली रात, तुझ्या-माझ्यातली
सांभाळून नेली, दूरवर !
दूरवर एक, दिसते सावली
पाऊले धावली, स्वप्नातच !
स्वप्नातले मोर, नाचून थकले
मोरपंख गेले, विसरून !
विसरून आले, हातावर मन
हेच समर्पण, तुझ्यासाठी !
तुझ्यासाठी पाणी, जपले डोळ्यांत
आयुष्यच त्यात, तरंगले !
पूजा भडांगे, पुणे







Be First to Comment