♪♪जीवन संगीत♪♪
संगीताचा आयुष्याशी
जवळचा संबंध असतो
अंतर्मनात संगीत लेवुन
मनुष्य जन्माला येतो
मंद्र,मध्य,तार तिन्ही
सप्तकात बोलतांना
योग्य आवाज लागायला
हवा काहीही सांगतांना
जीवन रुपी संगीताचा
रियाज कायम करावा
विविध भावरुपी रागांचा
अभ्यास सतत असावा
योग्य वेळी योग्य स्वर
सापडायला हवा
कोणती हवी लय
याचा रियाजच हवा
कुठे कोणता शब्द
वर्ज्य कळायला हवे
वादी,संवादी,विवादी
यांनाओळखायला हवे
प्रत्येक भाव रागाचा
गान समयही असतो
त्या त्या वेळी ते गाऊन
आनंद द्विगुणित होतो
जीवन रुपी संगीताशी
जेव्हा एकरुप होतो
नकळतपणे भाव गंधार
तेव्हा सहजच गवसतो
वैशाली केतकर, नवीन पनवेल







Be First to Comment