‘कविता’..सोबतीला तु हवीच.!
दुरचा तो रस्ता,वळणांचा तो घाट
पार करण्याकरिता,धरशील का तू हात..?
कल्पनेचे मनोरे अन् शब्दांचे ते डोंगर
रचताना अन् चढताना,करशील मनात घर..?
तुडूंब भरले ढग अन् पावसाच्या सरी
तृप्त होऊन झेलताना,असशील सोबतीला कधीतरी..?
मंद मंद वारा अन् सृष्टीचा तो गंध
श्वासात भरून घेताना,लागेल तुझा छंद..?
नभीचा तो रवि अन् शांत शितल शशी
ऊन सावलीच्या खेळातही,तू असशील माझ्यापाशी..?
निळ्या निळ्या आकाशातील नक्षत्रांचे देणे
धुंदतेत पाहताना तुझ्यासवे,उतरतील मनात चांदणे..?
मनाची ती घालमेल अन् मनातले ते काहूर
तु सोबत असताना,भासत नाही हुरहुर..!
‘तु अन् मी’ एक होवू, मिठी मारू घट्ट..
सोबतीला तु हवीच..!पुरवशील एवढा हट्ट ?
पद्मजा कुलकर्णी., खांदा कॉलनी






Be First to Comment