नवी पालवी…
वठलेल्या त्या, झाडावरती
नवी पालवी, अवचित फुटली
त्यालाही हे , उमगत नाही
जगण्याची ही, जिद्द कुठली
सुकलेल्या या, देहावरती
मायेची ती, ओल जाणली
आशेची मग, छान लकेर
फांदीमधुनी, नवी उमटली
संपलेच तर, होते अवघे
एकच धागा, बाकी उरला
आस अशी ही, मनी धरूनी
कोंब एक मग, तो अंकुरला
हिरवी हिरवी, पाने फुलली
सुकली फांदी, पुन्हा बहरली
वठलेल्या त्या, झाडालाही
उमेद आता, नवी लाभली
सारे कधीच, संपत नाही
एक थेंबही, केवळ पुरतो
वठलेल्या त्या, झाडातुनही
वृक्ष नवा मग, फुलून येतो
सौ. सुजाता कुलकर्णी, आदई







Be First to Comment