मला वाटते
मला वाटते,
घ्यावी अशी ही उंच भरारी
स्वच्छंद पक्ष्यासारखी स्वारी
क्षितीजाच्या पलीकडली सारी
पहावी स्वच्छंद दुनिया न्यारी
मला वाटते,
घेऊन गिरकी आनंदाने
मंत्रमुग्ध व्हावे संगीताने
सुरांच्या या दुनियेत रमावे
स्वप्नपूर्तीचे ध्येयं गाठावे
मला वाटते,
जे जे हवे ते सारे मिळावे
मनासारखे मस्तीत जगावे
नको संघर्ष अन् नको ती चिंता
फक्त अन् फक्त आनंदगीत गावे
मला वाटते,
कशाला करावी कोणाची निंदा
चेहऱ्यावरती हास्य राहू दे सदा
प्रेम द्या अन् प्रेम घ्या आहे एकच आयुष्य
आनंदाने, प्रेमाने घालवा वर्तमान अन् भविष्य
मला वाटते,
ईश्वरानं सारं काही दिलंय साऱ्यांना
पण ते घ्यावं कसं हेच कळत नाही माणसांना
सूर्य, चंद्र, वारा, पाऊस सर्व कसे शिस्तबद्ध
पण काही म्हणा बुद्धिवान माणसांपेक्षा
हा निसर्ग आहे कायम श्रेष्ठ
मला वाटते,
म्हणूनच मी घेईन उंच भरारी
आनंदाने हसत करेन मी स्वारी
पाहीन विजयाची अनोखी दुनिया न्यारी
सामावून घेईन हृदयात
फक्त प्रेमाची दुनिया सारी
- अॅड. सुरेखा प्रशांत भुजबळ, नवीन पनवेल








Wahh awesome 👌
Beautifully penned ..
Keep it up !