चहा
संसाराच्या उकळत्या पाण्यात
घालू अहंकाराची चहा पावडर
स्नेहाची साखर शिस्तीचं आलं
अहंकार गळून येईल रंग सुरेखसा
थोडं आपुलकीचं, मैत्रीचं दूध
अति नको उकळायला
कडू होईल चव
समजुतीने घालू आवर
क्रोधाच्या उकळण्याला
जिव्हाळ्याच्या कपात
गाळून घेऊ त्याला
सर्व ऋतूत आबालवृद्धांना
भुरळ पाडणारा चहा
कधी वेलची कधी गवतीचहा
कधी मसाल्याचे पदार्थ
चहात आणू विविधता
रोजचा चहा असला
तरी नवीन दिवसाचे
करतो नव्याने स्वागत
कामाला येतो उत्साह
संपून जातो थकवा मरगळ
कधी संवाद सुरू करायला
तर कधी सुसंवाद वाढवायला
चहाच तर करतो मदत
बरोबर असला वडा चिवडा
तर आणखीनच येते रंगत
मग चहाच्या पेल्यातील वादळं
चहा बरोबरच संपतात
कधी खानावळ कधी टपरी
कधी पंचतारांकित
आपापली आब राखत
चहाची वाट पाहतात
कधी बशीत ओतून
फुर्रsss आवाज करून
कधी मग् मध्ये कधी मटक्यात
तर कधी ग्लासमध्ये
कधी किटलीत उंची कपात
चहा आपली शान वाढवतो
काही नाही तरी चहा घेऊन जा
असा आग्रह होतो
आणि आलेला पाहुणा
घटका दोन घटका जास्तच रेंगाळतो
चहाबाजांना हवा असतो
गरमागरम चहा
कधी दुधाचा कधी कोरा
माणसा-माणसातले
मर्मबंध जपणारा
सुखदुःखात परिपूर्ण साथ देणारा
भज्यांची रंगत वाढवणारा
जागतिक मान्यतेचा
स्थळ-काळ-वेळ
याचे बंधन नसणारा
एकमेव चहा
सौ. स्वाती लेले, नवीन पनवेल









Be First to Comment