Press "Enter" to skip to content

खरंच कुणाला कळले का?

खरंच कुणाला कळले का?

रिमझिम पावसात भिजावं वाटतं
पावसाच्या थेंबाना झेलावं वाटतं
पण मेघांचे अश्रू कोणाला दिसले का
खरंच कुणाला कळले का?

मस्त नाजूक गुलाबाला पहावं वाटतं
आपल्या प्रिये ला थाटात द्यावं वाटतं
पण काट्यातल्या त्याचे दुःख दिसले का
खरंच कुणाला कळले का?

सर्कशीत विदूषकावर मनसोक्त हसले
त्याच्या करामती पाहून डोळे दिपले
पण मुखवट्या मागचे अश्रू कधी दिसले का
खरंच कुणाला कळले का?

चकाकणारं दागिने घालावे वाटतात
सगळ्यांना श्रीमंती मिरवून दाखवतात
पण तापलेल्या सोन्याचे चटके दिसले का
खरंच कुणाला कळले का?

चंद्राच्या प्रकाशात सोबत फिरले
हातात हात घेऊन प्रेमात बुडाले
पण चंद्राचे शांतपणे जळणे दिसले का 
खरंच कुणाला कळले का?

बायकोवर मनमुराद विनोद केले
तिच्यावर हवे तसे अधिकार गाजवले
पण तिच्या मौनामधील प्रेम कधी दिसले का
खरंच कुणाला कळले का?

  • शेखर अंबेकर, आदई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.