प्रतिबिंब
कित्येकदा वाटायचं,
आरशातलं प्रतिबिंब
माझ्याही येईल समोर
आणि चित्रपटातल्यासारखी
झपकन त्याची आणि माझी
होईल नजरानजर…
मी म्हटलं मनात
असं काही नसतं
चित्रपटात बघितलेलं
खोटं खोटंच असतं…
असं म्हणून मी वळणार
इतक्यात आवाज आला
“अगं थांब!!!”,
हबकले, थोडी थबकले
उभीच राहिले जराशी लांब…
” घाबरतेस काय अगं
तुझंच प्रतिबिंब आहे मी
न्याहाळायचीस ना आरशात
मी येईन म्हणून नेहमी?!!!
आता तरी बोल जरा
स्वतःच स्वतःशी
दडवून ठेवलंयस काय काय…
खोल मनात तळाशी,
किती, किती पडलेत प्रश्न
तुझ्यामाझ्यातच आहे उत्तर
अगं, बाहेर काय बघतेस,
तुझ्याच कुपीत तुझं अत्तर”!!!
एॅड्. सायली सचिन गोखले,
पनवेल






Be First to Comment