Press "Enter" to skip to content

तेंव्हा तुझी आठवण येते

तेंव्हा तुझी आठवण येते

वसंताच्या नवचैतन्यांत
उत्साह भरभरून वाहत असतो
सृष्टी आनंदाने कूस बदलते ना,
तेंव्हा तुझी आठवण येते.

ग्रीष्मातील रखरखलेल्या दुपारी
दूरवर एखादा डोलणारा
भरगच्च गुलमोहर दिसतो ना,
तेंव्हा तुझी आठवण येते

अचानक पणे एखादी वावटळ उठते आकाशात
धुळीचे लोट उठतात आणि त्या बरोबर
पालापाचोळा सुद्धा उंच विहारतो गगनात,
तेंव्हा तुझी आठवण येते

अचानक आभाळ भरून येतं
अंधारून येत मन सुद्धा आणि
क्षणात बरसात होते वळवाच्या पावसाची,
तेंव्हा तुझी आठवण येते

तप्त भेगाळलेल्या मातीवर जेंव्हा बरसतात
पहिल्या पावसाचे थेंब, शांतवतात तिला
न्हाऊ घालून मृदगंधी करतात ना,
तेंव्हा तुझी आठवण येते

श्रावणात सुरू होतो हिरवाईचा खेळ
ऊन पावसाचा सुरू होतो लपंडाव
त्यातच माझे मन हरखून जाते,
तेंव्हा तुझी आठवण येते

हळूच शरदाची चाहूल लागते
टपोऱ्या चांदण्यात कोजागिरी येते
तेजस्वी पूर्ण चंद्रबिंब पाहते,
तेंव्हा तुझी आठवण येते

शिशिरा मध्ये थंडीचे साम्राज्य पसरते
झाडांची पानगळ होत असते
गारठलेल्या सृष्टीला कोवळी ऊब हवी असते,
तेंव्हाही तुझी आठवण येते.

प्राची देशपांडे, खांदा कॉलनी

One Comment

  1. Anant khot. Anant khot. September 23, 2020

    सिटीबेल काव्याकट्टावर नवोदित कवींचे काव्य खूपच अर्थपूर्ण असतात.
    सगळ्यांचे कौतुक अन अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.