आनंद..
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…ही बालकवींची कविता अजरामर आहे. मी शाळेत असतांना ही कविता चालीवर म्हंटली होती, आणि बक्षीसही मिळाले होते. त्यावेळी मला इतका आनंद झाला होता कि मी आनंदाने नाचतच घरी गेले होते, ते आठवून मला खूप हसू आले, हसून हसून पुरेवाट झाली माझी!
यावर्षी आई निवांत राहायला आली होती. चांगली महिनाभर! आईसोबत गच्चीत बसून रोजच गप्पा रंगत होत्या. विषय होता- माझे बालपण..तिने सांगितले कि, मला चक्क एक वर्षाची असतांना खूप आनंद झाला होता. तुम्ही म्हणाल कसे शक्य आहे हे! हो मी नुकतीच चालायला लागले, दोन, चार पाऊले टाकली आणि आनंदाने डोळे मिचकावून हात वर केले आणि बद्कन खाली पडले..! हे चित्र मनात रंगविले आणि माझ्या मुलींचे असेच पहिले पाऊल टाकतांनाच्या गोड आठवणीत मी रमून गेले..! बालवयात पण आनंद असा असतो ! तोंडात दात नसले तरीही एक वर्षाचे बाळ चॉकलेट दाखवल्यावर त्याला जो आनंद होतो तो ही प्रचंड गोड, अफलातूनच !!
शाळेत पास झाल्याचा आनंद, आई बाबांनी, सगळ्यांनी कौतुक केले कि आनंद होतो , इतका कि, आनंद पोटात माझ्या मावेना, मावेना ! असा.
मला गाण्यात, वाचनात लिखाणात प्रचंड आनंद मिळतो पण शांत, सकारात्मक विचार ठेवून साधेपणाने आयुष्य जगण्यातही खरा आनंद मिळतो , दुसऱ्यांना हसवण्यात व सगळेच छान पदार्थ खाऊ घालण्यात मला खुप आनंद मिळतो.
वडिल डॉक्टर आणि समाजसेवक होते . त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडला, आणि मलाही समाजसेवा करण्यात खूप आनंद मिळू लागला. गरजवंतांना मदत करावी, कुणी दु:खी असेल तर त्याला त्याच्या अडचणीतून बाहेर काढणे. यात खरा आनंद मिळू लागला.
मग पुढे आनंदाची मालिका चालूच राहिली ती अशी, लग्न ठरले मनासारखा जोडीदार मिळाला …आणि तुम्हांला सांगते मला इतका आनंद झाला कि, मी चक्क आज मदहोश हुआ जा ये रे, मेरा मन, मेरा मन ,म्हणत गोल फिरु लागले ! नवीन संसारात रमले, आनंदी झाले, दोन कन्या रत्न झाले, तो आई झाल्याचा आनंद,आणि सोन्यासारखी माणसे मिळाली , मी तर आनंदात न्हावून निघाले.
मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खुप आवडते.आम्ही आपुलकी मळ्यात गेल्यावर तेथील झाडे, हिरव्यागार व शुद्ध वातावरणाने मन प्रसन्न होऊन जाते, आणि गच्चीवर झोपल्यावर तर त्या थंडगार हवेची झुळूक अंगावर आली कि अहाहा..! मन आनंदून जाते, आनंद तुमच्या मानण्यात असतो. दुसऱ्याला आनंदी ठेवणे व स्वत: आनंदी राहील्याने आपल्या तब्येतीवर चांगले परिणाम होतात.
नवरोबाने वाढदिवसाला आणलेले सरप्राईज गिफ्ट बघून झालेला आनंद तर मनाच्या आरपार जातो, हो न…! घरच्यामंडळीं सोबत एकत्रित गप्पा , मज्जा व एकत्रित खाण्याचा आनंद, आमच्या अहोंनी,आणि मुलींनी मला बरे नसल्यावर घेतलेली काळजी बघून मिळणारा आनंद काही औरच!!
आमच्या अहोंसोबत दररोज दोन्ही वेळेची कॉफी घेतल्याचा आनंद म्हणजे अहाहा..स्वर्ग सुखच.!
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची…असा प्रयत्न करत आले आहे. आयुष्य उन – सावलीसारखं असतं.आपल्याला ठरवायचं असत दु:खाच्या उन्हात घामाघूम व्हायचे कि आनंदाच्या सरींत न्हावून निघायचे. माझा प्रयत्न असतोच कुणाला सोबत घेवून आनंदाच्या लाटेवर स्वार होण्याचा !! कारण आनंद दिल्याने आनंद मिळतो. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या चेहऱ्यावरील आनंद दिसतो ना अगदी तसाच आनंद मी अनुभवते बरं ! आता तुम्हीच सांगा तुमचा आनंद कशात आहे ?
सौ. मानसी जोशी, खांदा कॉलनी
Be First to Comment