

पनवेलच्या गणेश भाजी मार्केटमध्ये कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन
पनवेल (प्रतिनिधी) पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे पनवेल येथील तलावाजवळ असलेल्या गणेश भाजी मार्केटमध्ये कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले. या मशीनचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील तसेच उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी क्लबच्या एसी मेंबर डॉ. शोभा पालेकर, वर्षा ठाकूर, नगरसेवक दशरथ म्हात्रे तसेच इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सध्या प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे नाले तुंबणे, जनावरांना होणारे नुकसान तसेच माती आणि पाण्याचे प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्यावरणपूरक पर्याय सहज उपलब्ध व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना या व्हेंडिंग मशीनद्वारे दहा रुपयांचे नाणे टाकून सहजपणे कापडी पिशवी खरेदी करता येणार आहे. कापडी पिशव्या टिकाऊ, पुन्हा वापरता येण्याजोग्या आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढण्यासही हातभार लागणार आहे.
इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असून हा उपक्रमही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकमुक्त समाज घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन क्लबच्या प्रेसिडेंट शुभांगी पिंपळकर व सेक्रेटरी डॉ. अमृता नाईक यांनी केले.




Be First to Comment