भारत विकास परिषदेचा अनोखा संकल्प
वादळग्रस्त गावांमधे वृक्षदान
श्रीनिवास काजरेकर
पनवेल दि. १५: भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेच्या वतीने वादळग्रस्त भागामधे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. परिषद आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त माध्यमातून वृक्षदान करण्याचा संकल्प करून त्याचा प्रारंभ म्हसळा तालुक्यातील लेप या गावापासून करण्यात आला.
मध्यतंरी प्रचंड पाऊस, पूर आणि वादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही गावांमधे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणावार नुकसान झाले होते. त्या भागात उत्पन्न देणारी झाडे उन्मळून पडली होती. त्यापैकी लेप हे रायगडमधील एक दुर्लक्षित गाव! या गावामधे विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे देण्यात आली. या गावामधील विद्युतयंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याने गाव पूर्ण अंधारात होता. पिण्याच्या पाण्याची समस्या होती. प्रथम परिषदेचे कार्यकर्ते स्वप्नेश विचारे व त्यांच्या सहकाऱ्यानी लोकवर्गणीतून सोलरकीटचे वितरण केले. त्यानंतर भारत विकास परिषदेने रोटरी क्लबच्या सहकार्याने आंबा, नारळ, पोफळी, काजू अशा एक ते दोन वर्षे व्यवस्थित वाढ झालेल्या वृक्षांचे मोफत वितरण केले. गावकऱ्यांनीही या अनोख्या मदतीबद्दल संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
चिरकालीन सहाय्य
“वादळग्रस्त भागामधे अन्नधान्य किंवा आर्थिक अशी तात्पुरती मदत करण्यापेक्षा त्याना कायमस्वरूपी उपयोगी पडेल असे सहकार्य करावे असे भारत विकास परिषदेने ठरविले. यासाठी वृक्षदानाचा संकल्प करण्यात आला. यामुळे त्यांचा उत्पन्नाचा स्रोत कायम राहील. म्हणून हे चिरकालीन सहाय्य ठरेल.”
गिरीश समुद्र
भारत विकास परिषद









Be First to Comment