चांदणचुऱ्याची भाकर
काल रात्री उशिराने
आला बाबा परतून
पोटात सारे कावळे
दमलेना ओरडून
भूक, भूक आणि भूक
दुसरे काही सुचेना
किती वेळा सांगूनही
पोट काहीच ऐकेना
आला आला बाबा आला
हातात जड पिशवी
आईही लगबगीने
घरात चूल पेटवी
गिरणीत सांडलेली
मिश्र पिठाची रांगोळी
हलके गोळा करुन
पिशवी भरे सगळी
पिठाचा चांदणचुरा
आई हाताने कालवी
भाकरीचा तो सुवास
रातराणीस लाजवी
दूर कोठे कोणीतरी
भाकऱ्या देई टाकून
कुत्रा मान फिरवून
जातसे त्यांना हुंगून
डॉ. समिधा गांधी, पनवेल







Be First to Comment