सिटी बेल लाइव्ह : विचार कट्टा 🔷🔶🔷🔶
रियाला अटक झाली आणि कंगनाचे कार्यालय तोडले याची घराघरात चर्चा. सागरी रस्त्याच्या भरावामुळे आपले राहते भाग बुडणार यावर लक्ष देण्याचे भान नागरिकांना नाही. काल समुद्राजवळच्या दोन कुटुंबांकडे गेलो. ते टीव्हीवरील रिया आणि कंगनाच्या बातमीत गुंग.
आपली तरूणाई मादक द्रव्यांच्या विळख्यात का सापडली आहे ? यावर विचार दिसत नाही. पंजाबात घराघरात ड्रग्जचा शिरकाव झालेला पाहून सावध होणे आवश्यक आहे. टीव्ही चॅनेल दिवसरात्र करमणूकीच्या नावाखाली निष्क्रियता पेरत राहतात. विचार आणि कृतिपासुन समाजाला परावृत्त करतात.
सागरी रस्त्यासाठी अजून १११ एकर भराव करावा लागेल असे प्रकल्पाच्या वतीने महापालिकेकडून न्यायालयात सांगितले. खरेतर हा प्रकल्प आणि आतापर्यंत त्याच्यासाठी झालेला भराव हीच समस्या आहे, अयोग्य गोष्ट आहे. प्रथमच दक्षिण मुंबई व गिरगाव बुडणे आणि गिरगाव चौपाटी गमावणे यातुन ते स्पष्ट दिसत आहे. प्रकल्पासाठी पुढे उपनगरात किनाऱ्यावरील साडेपाच किमी मॅनग्रोव्ह गाडली जाणार आहेत हे प्रकल्पाच्याच मसुद्यात आहे. अर्थात शेकडो एकरचा भराव होणार. आज एका तुकड्याचा विचार होत आहे. उपनगरात भराव होईल तेव्हा असा युक्तिवाद केला जाणार की
इतका पैसा खर्च केला. आता थांबणार कसे ? हे ब्लॅकमेलिंग वांद्रे- वरळी सी लिंकच्या वेळीही झाले.
या प्रकल्पाचा दुष्परिणाम होणारच नाही म्हणून अधिकारी सरळ खोटे सांगतात आणि दुष्परिणाम झाला तर प्रकल्प थांबवण्याऐवजी आपणच केलेल्या गुन्ह्याचे अजून खर्चिक आणि काम काढण्यासाठी भांडवल करतात. आताच पहा. प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई बुडाल्यावर गिरगाव चौपाटीची धूप झाल्यावर प्रकल्प रद्द करून अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवुन शिक्षा व्हायला हवी. त्याउलट ते निर्लज्जपणे जी कधीच संरक्षण देऊ शकणार नाही अशी संरक्षक भिंत बांधण्याचे काय सुरू करतात. जनतेचा पैसा म्हणजे जणू यांची जहागीर . ही तीस ते पन्नास फूट रूंद भिंत सागराची अधिक कोंडी करणार. त्याची जागा हिरावुन घेणार. हा रस्ता आणि भिंतीच्या भरावांनी हटवलेला सागर इतरत्र आक्रमण करणार आणि अल्पकाळात या भिंतींनाही तोडणार. यातुन एक दुष्टचक्र तयार झाले आहे. जनतेची लूट होत आहे. यांची खाजगी मालमत्ता वाढत आहे. भीतीदायक गोष्ट ही की २९ ऑगस्ट २००५ ला संरक्षक भिंतीमुळे अमेरिकेतील न्यू आॅर्लिन्स शहर भयंकर स्वरूपात बुडाले. महिनाभर सागराचा भाग बनले. सागरी रस्ता प्रकल्प मुंबईची तशी गत करणार आहे. त्या शहराची आणि मुंबईची तुलना करता अशा दुर्घटनेत मुंबई नामशेष होईल.
तुम्ही मुळात भराव करता व तापमानवाढ न थांबणाऱ्या स्थितीत ( अपरिवर्तनीय ) गेली असताना मोटारींना म्हणजे अधिक कार्बन उत्सर्जनाला प्रोत्साहन देणारा प्रकल्प करता हाच गुन्हा आहे असे नागरिकांनी ठणकावून सांगितले पाहिजे. परंतु टीव्हीवरील मसालेदार प्रकरणात दिवसभर गुंतल्यामुळे यासाठी लागणारे ज्ञान कधी घेणार आणि कृतिसाठी वेळ कसा देणार ?
तिकडे आसामात शंभर दिवस उलटुन गेल्यावरही तेल विहिरी जळत आहेत. हे तेल उत्खनन या प्रकल्पांसाठीच आहे. आसाम सरकारने आग विझावी म्हणून उत्तर प्रदेशातून मांत्रिक आणुन गूढ विधी केले अशी बातमी आली.
इथे २६ मे १९८७ च्या तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री. के जी परांजपे यांच्या वाहतुक विषयक समितीच्या अहवालापासुन पुढील सर्व सरकारी अहवालांनी मुंबईच्या सागरात भराव करू नये तसेच अरूंद भूभाग असलेल्या दक्षिण मुंबईत कोंड्या वाढणार असल्याने अधिकची वाहने नेणारे रस्ते करू नये असे सांगितले आहे. पण त्याविरुद्ध गेली २५ वर्षे वर्तन केले गेले.
सागरी रस्ता प्रकल्प पावसाळी पाण्याचा निचरा पूर्ण बंद करेल. विरारपर्यंतच्या सर्व वाळुच्या चौपाट्या नष्ट करेल. अरबी समुद्राचे अधिक गलिच्छ गटारात रूपांतर करेल. आपण भावी पिढ्यांना बकाल शहर देत आहोत असे म्हणायची देखील सोय नाही कारण जे पृथ्वीवर घडत आहे ते पाहता सध्याची बालकांची पिढी ही शेवटची पिढी आहे आणि ती मध्यमवयात जाताना मानवजातीचे उच्चाटन होईल.
याची जाणीव झाल्याने जर्मनी आणि युरोपातील देशांनी सार्वजनिक बस वाहतूक सेवा विनामूल्य केली. मोटारीचा त्याग करून ते त्यासाठी पायाभुत संरचना तयार करतात आणि आपले अधिकारी सव्वाशे वर्षे उत्कृष्ट सेवा देणारी, उत्तम पायाभुत संरचना असलेली बेस्ट बस सेवा बंद करून तिच्या २७ बस डेपोंच्या रूपातील पायाभुत संरचनेचे लचके तोडण्यास उतावीळ झाले आहेत. यापूर्वी जमेल तसे तोडले आहेतच. आताही बेस्टला संपवण्यासाठी खाजगी बसना आणले आहे. लाॅकडाऊनच्या कसोटीच्या काळात तसेच मुंबईत पूराच्या स्थितीत बेस्ट महत्वाची भूमिका करत असूनही बेस्टच्या १२०० बस मोडीत काढण्याचा डाव आहे. नागरिकांनो, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याच्या नावाखाली तुम्ही कसे फसवले गेलात आणि इतर देशांना हेवा वाटेल अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहतुक सेवेची स्वार्थापायी कशी वासलात लावली जात आहे ते समजुन घ्या आणि जागे व्हा. स्वतःचे पाकीट मारले तर पाकिटमाराला बेदम मारले जाते त्याचा तिरस्कार केला जातो पण आपल्या सर्वांच्या म्हणजे देशाच्या तिजोरीवर दरोडा घातला जात असताना आपण निष्क्रिय का? की पाकिट मारले जाणे समजते आणि हा दरोडा समजत नाही? दरोडेखोरांना प्रतिष्ठा का दिली जाते, आणि आपली देशभक्ती कुठे जाते?
मेट्रो ३ भूयारी रेल्वेच्या स्वतःच्या पर्यावरण मुल्यांकन अहवालात नमूद केले आहे की ही रेल्वे जेवढ्या प्रवाशांना सेवा देणार तेवढ्या सेवेसाठी ४५० बस लागतील व त्यासाठी रूपये २२० कोटी फक्त खर्च होईल. याच अहवालात या रेल्वे प्रकल्पाचा खर्च दिला आहे. तो आहे २४३४० कोटी रूपये. आता त्यात सुमारे दहा ते पंधरा हजार कोटी रूपयांची भर पडली आहे. ही स्पष्टपणे लूटमार आहे. जर राजेशाही असती तर यांना हे पैसे सरळ खिशात घालता आले असते परंतु लोकशाहीत तसे अजून करता येत नाही म्हणून विकासाच्या मुखवट्याआड ते केले जाते. त्यासाठी पायाभुत संरचना विकास, प्रगती अशा शब्दांची धूळफेक होते. लाॅकडाऊनमधे काही कोटी माणसे उत्पन्नाचे साधन गमावुन बसली असताना काही मोजक्या माणसांची धन करण्यासाठी अनावश्यक महाकाय प्रकल्प घाईने करण्यात येतात.
आपल्या मुला नातवंडांसाठी तरी आपला बधिरपणा, उदासीनता, निष्क्रियता सोडणार की नाही? देश कोर्टातुन चालवायचा आहे का?
विचार करा आणि सागरी रस्ता प्रकल्प थांबवा, नाहीतर आमच्या मुलांसाठी आम्ही काही करतो असे म्हणू तरी नका. तुमच्या मुलांना पैशांतुन जे देता त्याची नाही तर त्यांना अस्तित्व देण्याची गरज आहे. प्रश्न इतका टोकाला पोचला आहे. जरा टीव्ही आणि नेटमधुन बाहेर पडुन खऱ्या जगात या.
आपला
अॅड. गिरीश राऊत
भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
दू. ९८६९ ०२३ १२७
Be First to Comment