Press "Enter" to skip to content

कर्जतकरांची सुरक्षा बेभरवशाची : कोरोना काळात सरकारी यंत्रणा अंकुशविना

यातून ना पत्रकार सुटले ना पोलीस !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 🔷🔶🔷🔶

माथेरान येथील जेष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेत पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने दुःखद निधन झाले . लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संतोष पवार यांनी जवळ जवळ २५ वर्षे समाजातील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून वृत्तपत्रात मांडून सरकारी यंत्रणा व नागरिकांच्या मधली कडी बनून महत्वपूर्ण कार्य केले . मात्र त्याच सरकारी यंत्रणेने त्यांचा घात केला .

या सरकारी यंत्रणेवर राजकीय अंकुश नसल्यानेच पत्रकार संतोष पवार यांच्यावर वेळेवर पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने ही वेळ आली , व आज ते आपल्यात नाहीत . यासाठी जबाबदार असणाऱ्या शासकीय यंत्रणेबरोबरच राजकीय यंत्रणा देखील दोषी असल्याची चर्चा येथे होत असून म्हणूनच कर्जतकरांची सुरक्षा आत्ता बेभरवशाची झाली असल्याचे दिसून येत आहे .
खालापूर तालुक्यातील पोलीस हवालदार कळमकर यांचे ही निधन शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची बातमी ताजी असताना आज कर्जतचे जेष्ठ पत्रकार संतोष पवार देखील आज बळी ठरले . मात्र राजकीय यंत्रणा निर्जीव गप्पगार आहे .

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी चौकशीचे आदेश दिले , बस …. काम संपले ! कोरोनाच्या काळात संपूर्ण रायगडातील सरकारी यंत्रणा अंकुशविना काम करताना दिसत आहे . जनतेवर समस्यांचे संकट असताना रोज वृत्तपत्रातून बातम्या झळकत असताना पालकमंत्री मात्र याकडे डोळेझाक करताना दिसत आहेत .

अवकाळी पाऊस , अतिवृष्टी , निसर्ग चक्री वादळ , त्यात कोरोनाचे संकट ! आजही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत , पैसे आले असे सांगण्यात येते मात्र अद्यापी ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत , गॅस पाईप लाईन ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून गेली त्यांना अजून मोबदला मिळाला नसल्याने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतो , अपंग – विकलांग – निराधार महिलांना पेंशन विना जगावे लागत आहे , कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय रुग्णवाहिका एक वर्षांपासून बंद असताना कोरोना काळात ती चालू न होणे , म्हणजेच सरकारी यंत्रणा किती काम करते , व यावर राजकीय हस्तक्षेप किती आहे , याचे चित्र आता जनतेसमोर आले आहे , आणि या सडलेल्या यंत्रणेमुळेच आज जेष्ठ पत्रकार संतोष पवार यांना जीव गमवावा लागला .

या अगोदर पासूनच १०८ ही रुग्णवाहिका बेभरवशाची आहे , वेळेवर येत नाही , यातील उपकरणे वेळोवेळी तपासली जाणे गरजेचे आहे , या यंत्रणेवर रुग्णांचे प्राण तरु शकतात , ही साधी बाब सरकारी आरोग्य यंत्रणेला समजू शकली नाही , ही खेदाची बाब म्हणावी लागेल .त्यामुळे नुसती चौकशी होणे गरजेचे नसून सडलेली शासकीय यंत्रणा सुधारणे गरजेचे वाटते , व यासाठी राजकीय यंत्रणा अजून सतर्क व सशक्त होणे गरजेचे आहे . म्हणूनच पायाला चक्री लावून पालकमंत्री यांनी रायगडात काम करणे आज काळाची गरज आहे , हे म्हणणे वावगे ठरणार नाही . मात्र या झोपलेल्या निर्जीव आरोग्य यंत्रणेमुळेच आज जेष्ठ पत्रकार संतोष पवार यांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचे दुःखद निधन झाले . त्यांच्या पत्रकारितेतील कार्यास अखेरचा सलाम !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.