Press "Enter" to skip to content

निसर्ग संवर्धनाची अनोखी धुळवड ; फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेरचा स्तुत्य उपक्रम !


तृप्ती भोईर : उरण

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३मार्च २०२६ रोजी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्ग संस्था,चिरनेरच्या वतीने धुलीवंदनाचे औचित्य साधून एक आगळीवेगळी श्रमदानाची धुळवड साजरी करण्यात आली. रंगाच्या उधळणीपेक्षा निसर्गाच्या संवर्धनाला प्राधान्य देत संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीवांसाठी आणि आदिवासी पाड्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मृतप्राय झऱ्यांचे व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोतांचे पुनर्जीवन करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला.

चिरनेर येथील संस्थेच्या श्री बापूजी देव देवराई प्रकल्पात वृक्षारोपण केलेल्या झाडांची मशागत, परिसराची साफसफाई आणि पेरीचे पाणी या पारंपरिक पाणवठ्या श्रमदान करून त्याचे पुनर्जीवन करण्यात आले.अनेक वर्षांपूर्वी स्थानिक आदिवासी कातकरी समाज या पाण्याच्या पिण्यासाठी वापर करत असे, मात्र काळाने वापर बंद झाल्याने हे झरे गाळाने पूर्णपणे बुजून गेले होते ,संस्थेने सातत्याने गाळ काढून या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा सुरू केला आहे .ज्यामुळे ऐन उन्हाळ्यात वन्यजीवनासाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. फ्रेंड्स ऑफ नेचर गेले ६ वर्षापासून सातत्याने धुलीवंदनाच्या दिवशी सुप्त अवस्थेत गेलेल्या या नैसर्गिक पाणवठ्यांना नवसंजीवनी देण्याचे काम करत आहे.

होळी नंतर वाढत्या उष्णतेमुळे आणि जंगलतोडीमुळे बाष्पीभवन वेगाने होऊन नैसर्गिक जलस्त्रोत आटतात, पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यामुळे जंगलातील वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात त्यामुळे मानव–वन्यजीव संघर्ष ,अपघात किंवा शिकारीचा धोका वाढतो. हा धोका कमी करण्यासाठी नैसर्गिक अधिवासात जलस्त्रोत उपलब्ध करणे गरजेचे आहे.

विकासाच्या नावाखाली होणारी अमर्याद वृक्ष तोड, डोंगरांचे सपाटीकरण आणि मानवनिर्मित वणवा या वाढत्या समस्या पाहता परिवर्तनाची गरज आहे. फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने या निमित्ताने सर्वांना आवाहन केले आहे की आपल्या परंपरा प्रतीकात्मक आणि पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करून निसर्गावरील ताण कमी करूया. केवळ होळी खेळण्यापेक्षा निसर्गाशी असलेले आपले नाते घट्ट करण्यासाठी अशा निसर्ग पूरक उपक्रमात सहभागी होऊ या ,आजपर्यंत संस्थेने कडापे डोंगर ,साई डोंगर, चिरनेर पोंडा, पेरीचे पाणी (चांदायले वाडी) श्री बापूजी देव देवराई चिरनेर अशा विविध ठिकाणी पाणवठा यांचे पुनर्जीवन यशस्वीपणे केले आहे. रंगाच्या धुळवडीपेक्षा श्रमदानाची धुळवड समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करतआहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.