Press "Enter" to skip to content

खोपोलीतील झेनिथ व केपी वॉटर फॉल परिसरातील थरारक रेस्क्यू ऑपरेशन

सह्याद्रीच्या खोऱ्यात अडकलेल्या दोन ट्रेकर्सची हेल्प फाउंडेशनकडून सुखरूप सुटका

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली शहरातील प्रसिद्ध झेनिथ वॉटर फॉल आणि केपी वॉटर फॉल परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या चेंबूर येथील दोन युवकांची हेल्प फाउंडेशन आणि खोपोली पोलिसांच्या समन्वयातून सुखरूप सुटका करण्यात आल्याची घटना रविवारी घडली.

आर्यन जितेश शिवलानी (वय १८) व जहान निलेश भाटिया (वय १८,) दोघेही रा. चेंबूर, हे युवक १४ जून रोजी सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ व केपी वॉटर फॉल परिसरात ट्रेकिंगसाठी आले होते. तळपते ऊन, अवघड चढ-उतार आणि प्रदीर्घ भटकंती दरम्यान त्यांच्याकडील पाणी आणि खाद्यपदार्थ संपले. दुर्दैवाने ते वाटही चुकले. सुरुवातीला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकण्याची असलेली उत्सुकता हळूहळू भीतीत बदलू लागली. काही वेळात अंधार पडणार आणि त्यानंतर काय, या विचाराने ते चिंताग्रस्त झाले.

अखेर त्यांनी आपल्या पालकांशी तसेच पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती देत मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

संबंधित परिसर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या पथकाद्वारे तात्काळ मदतकार्य सुरू करत हेल्प फाउंडेशनलाही सहकार्याचे आवाहन केले.

हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सौरभ घरत, महेश भोसले, अमोल कदम, निलेश यादव, राजवर्धन मोहिते, भक्ती साठेलकर आणि धर्मा पाटील यांनी तत्काळ संबंधित युवकांशी संपर्क साधत त्यांना धीर दिला. “आम्ही मदतीसाठी येत आहोत,” असा विश्वास देत रेस्क्यू टीमने केपी वॉटर फॉलच्या दिशेने अवघड चढाई सुरू केली, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर ते त्या युवकांपर्यंत पोहोचले. त्यांना एनर्जी ड्रिंक, पाणी आणि खाद्यपदार्थ देत मानसिक आधार देण्यात आला. त्यानंतर कोणतीही शारीरिक इजा होऊ न देता दोन्ही युवकांना सुखरूपपणे खाली आणण्यात आले.
खाली दत्त मंदिर येथे आल्यानंतर जगदीश जाखोटिया यांनी सर्वांची आस्थेने विचारपूस केली तसेच संबंधित युवकांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांची मुले सुरक्षित असल्याची माहिती दिली.

यानंतर खोपोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आणि संबंधित युवकांना रवाना करण्यात आले. साधारणतः काही तास रंगलेल्या या थरारक रेस्क्यू मोहिमेचा शेवट सुखरूप आणि सकारात्मक परिणामाने झाला. या मदतकार्याबद्दल युवकांच्या पालकांनी हेल्प फाउंडेशन आणि खोपोली पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

दरम्यान, सह्याद्रीच्या कपाऱ्यात निसर्गाचा आनंद घेताना ट्रेकर्सनी अभ्यासपूर्ण नियोजन, सुरक्षित हालचाली आणि स्वतःच्या जीविताची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी यानिमित्ताने केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.