
वीज ग्राहकांना देण्यात येणारी सेवा ही परिपूर्ण असावी ः खा.श्रीरंग बारणे
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल, उरण व कर्जत परिसरातील अनेक वीज ग्राहकांना गेल्या 15 दिवसांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीने उपाययोजना केली असली तरी आगामी काळात वीज ग्राहकांना देण्यात येणारी सेवा ही परिपूर्ण असावी, असे आवाहन खा.श्रीरंग बारणे यांनी आज पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात घेतलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठकीत केले आहे. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली.
सदर बैठक खा.श्रीरंग बारणे यांनी आयोजित केली होती. या बैठकीला पनवेल, उरण व कर्जत येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने अधिक्षक अभियंता दिपक पाटील यांच्यासह इतर अधिकारी वर्ग, जिल्हाप्रमुख व नगरसेवक रामदास शेवाळे, महानगरप्रमुख व नगरसेवक ॲड.प्रथमेश सोमण, नगरसेविका सायली सरक, शहरप्रमुख तुकाराम सरक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीची माहिती देताना खा.श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, आगामी काळात विद्युत पुरवठा खंडीत होवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
त्यामध्ये सबस्टेशन, अंडरग्राऊंड उपाय योजना, डीपी, केबल बदलणे, उघड्या डिपी बंदिस्त करणे, फायबर फिडरचा वापर करणे, वीज चोरीचे प्रकार थांबविणे, स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहकांना योग्य ती माहिती द्यावी, तसेच शहरी भागात 4 नवी सबस्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात 3 नवीन सबस्टेशन पुढील 3 महिन्यात उभारण्यात येणार असल्याने ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्राहकांसाठी विविध योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम संबंधित विभागाने करणे जरुरीचे आहे. या संदर्भात त्यांना मार्गदर्शन केले आहे. आगामी पावसाळ्याच्या काळात वीज वितरणमध्ये काही त्रुटी किंवा विद्युत पुरवठा खंडीत झाला तर कुठे संपर्क साधावा या संदर्भात सर्व नागरिकांना, शासकीय यंत्रणेला याची माहिती वेळोवेळी देण्यात यावी.
ग्राहक हा राजा असून त्याला वीज पुरवठा कशा तऱ्हेने सुरळीत मिळेल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. कार्यालयामध्ये तुमचे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. एखादी घटना घडल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी पोहचून तेथील खंडीत वीज पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा, ग्रामीण भागात सुद्धा तेथील बांधवांना वीज पुरवठा कशा तऱ्हेने सुरळीत मिळेल याकडे लक्ष घालावे, यासाठी केंद्र शासनाकडून जी काही मदत लागेल ती करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले.




Be First to Comment