
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन
वहाळ येथील पीएमश्री शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी) उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करून आणि औक्षणाने स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण पनवेल तालुक्यातील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद शाळा, वहाळ येथे पाहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रयोगशाळेची पाहणी करून तिची कार्यपद्धती जाणून घेतली.या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, उपस्थित होते.
या डिजिटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृकश्राव्य पद्धतीने शिक्षण मिळणार असून, सर्व वर्गांचा अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अध्यापन अधिक प्रभावी, रंजक आणि सुलभ होणार आहे. ऑनलाईन परीक्षा प्रणालीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारच्या डिजिटल लॅब उभारण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या ज्ञानाची आणि शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांची शिस्त, आत्मविश्वास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तावाढीमुळे पालकांचा सरकारी शाळांवरील विश्वास दृढ होत असल्याचे नमूद केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये, स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव तसेच सामाजिक जबाबदारी विकसित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य शासन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत
पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात एक अनोखा आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट मुलाखत घेत उपस्थितांची मने जिंकली. आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांमधून विद्यार्थिनीने शिक्षण, सामाजिक कार्य, नेतृत्व आणि डिजिटल युगातील बदलांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थिनीच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देत आपल्या विद्यार्थी जीवनापासूनच्या सार्वजनिक प्रवासाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच डिजिटल शिक्षण हे भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याचे सांगितले.
विद्यार्थिनीने घेतलेली ही मुलाखत शाळा प्रवेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली. मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



Be First to Comment