Press "Enter" to skip to content

     जखम अजूनही भळभळतीच !

     जखम अजूनही भळभळतीच !

    11 जुलै 2006 संध्याकाळी पावणे सात चा सुमार. मी,कृपेश आणि दिवाकर सिंग सीएसटी स्टेशन बाजूच्या गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर जोगळेकर यांच्या बरोबर गप्पा मारत बसलो होतो.सी जी एच एस मध्ये आमचे एक प्रोडक्ट घुसवण्यासाठी आमचे कसब आजमावत होतो. भजी आणि चहाची आवर्तनं सुरू असतानाच बायकोचा घाबऱ्या आवाजात फोन आला. कुठे आहेस? मी फिल्ड वर असताना एरवी बायकोचा हा फोन रात्री साडे नऊ नंतर यायचा, आज अशी अवेळी ही विचारणा का बर होत असावी? याचा तर्क लावत असतानाच तिने कपऱ्या स्वरात सांगितले मुंबईत सात बॉम्बस्फोट झालेत. सातही बॉम्ब स्फोट फर्स्ट क्लास मध्ये झालेले त्यामुळे तिचा जीव टांगणीला लागला होता.(अस्मादिक फर्स्ट क्लास ने फिरायचो हे वेगळे सांगायला नको) आम्ही वाचलो होतो पण तब्बल 209 जणांच्या नशिबी हे सुख नव्हते.निष्पाप जीव तडफडून मेले….714 दिव्यांग झाले.आज या घटनेला 14 वर्ष झाली तरी मुस्लिम आतंकवाद्यांनी दिलेली ही जखम अजून सुद्धा भळभळती आहे.
दिवाकर पश्चिमी उपनगरात राहणारा,सर में यहा से बोरिवली तक बस से जाता हुं, आप तुरंत निकलिये…असे म्हणत त्याने निरोप घेतला,आम्ही स्टेशन कडे निघालो सर्वत्र भीतीचा माहोल,आजच्या सारखे सोशल मिडिया तेव्हा बोकाळले नव्हते,त्यामुळे मिळेल त्या माहितीवर पुढे जात राहायचे..सी एस टी च्या हार्बर लाईन वर येऊन प्लॅटफॉर्म 1 आणि 2 च्या मध्ये उभा राहिलो… पनवेल,बेलापूर,वाशी लोकल अक्षरशः रिकाम्या जात होत्या.बॉम्ब स्फोटाच्या भीतीने कुणी त्यात चढायला तयार होत नव्हते…अखेरीस हिम्मत करून गाडीत चढलो संपूर्ण प्रवासात जे आज घरी पोचणार नाहीत,किंबहुना त्यांची छिंन विच्छिन्न  कलेवरे घरी पोहोचतील त्यांचे काय???हा प्रश्न घुमत होता, मन सुन्न करून गेला.त्याही पेक्षा सुन्न करतोय तो या बॉम्ब स्फोटाचा तपास,दोषींना शासन करण्याचा लाल फितीचा कारभार आणि नुकसान भरपाईची ची टिंगल !!!
      बॉम्बस्फोटांनंतर 10 दिवसांच्या आतच दहशतवादविरोधी पथक दहशतवाद्यांपर्यंत पोहोचले होते. 20 जुलै ते 3 ऑक्टोबर 2006 दरम्यान एटीएसने अनेक दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती.पाकिस्तानची संस्था आयएसआयने दहशतवादी संघटना लष्कर ए-तोयबाच्या मदतीने हे बॉम्बस्फोट घडवल्याचे समोर आले होते.तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींचा संबंध सिमीशी असल्याची माहितीही मिळाली होती.
2008 मध्ये या घटनेतीच्या पार्श्वभूमीवर सादिक शेख, आरिफ शेख आणि मोहम्मद शेख यांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीनचे नावही समोर आले होते.पोलिसांच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीन प्रमुख रियाज भटकळने हे बॉम्बस्फोट घडवले असल्याची कबुली तिघांनी दिली होती. त्यानंतर भटकळलाही अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयात जून 2007 साली या खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि 19 ऑगस्ट 2014 रोजी पूर्ण झाली.सुनावणीदरम्यान फेब्रुवारी 2 रोजी सर्वोच्च न्यायालय सुनावणीवर स्थगिती आणली.
कमाल अंसारी या आरोपीने मकोका कायद्याच्या वैधतेलाच(किती साला कमकुवत कायदा आहे न आपला???) आव्हान दिले होते. त्यानंतर 23 एप्रिल 2010 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू करण्यात आली.
पोलिसांनी तब्बल चारशे जणांना अटक केली होती, त्यातील अवघे तेरा दोषी ठरले आणि बारा जणांना शासन झाले. पाच जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेप झाली. यासाठी 192 साक्षीदारांना साक्षी द्याव्या लागल्या.8 पोलीस कर्मचारी,8 डॉक्टर,5 प्रशासकीय सेवेशी निगडीत अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. 9 वर्ष चाललेल्या या खटल्याची अखेर सांगता झाली.
थोडक्यात काय तर दोषींना पकडायला 10 दिवस आणि ते दोषी आहेत हे सिध्द करायला 9 वर्षे….बॉम्ब स्फोटाच्या दोषींना शासन करण्यापेक्षा बॉम्ब स्फोट करणे सोपे की हो!असे म्हणणे अजिबात अतिशयोक्ती होणार नाही…
मुंबईत उपनगरीय रेल्वे ने प्रवास करून कामावर जाणारा संध्याकाळी परत येई पर्यंत त्याच्या घरच्यांचा जीव टांगणीला असतो…या अस्थिर जिवांना covid मुळे थोडा दिलासा मिळत असला तरी,आर्थिक विवंचना सतावत असणार! थोडक्यात काय तर अस्वस्थ भूतलावर बुड टेकवून बसणे हे मुंबईकर त्याचे जीवनमान समजू लागला असेल.

मंदार मधुकर दोंदे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.