आपल्याला काय? काहीही चालते…
कंगना आणि संजय राऊत यांनी सध्या मिडिया स्पेस व्यापून टाकली आहे.तिकडे उत्तर आणि उत्तर पूर्व हिंदुस्थानात आपल्या सैन्याने शड्डू ठोकत मुसंडी मारली आहे.संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत गृहमंत्री चीन ला “आरे ला कारे !”करत आहेत. Covid-19 हळू हळू पेशंट फ्रेंडली बनत असला तरीही प्रसार थांबत नाही. त्याच्या प्रतिबंधात्मक लसीच्या बाबत पुन्हा एकदा प्रसारमाध्यमे मुकी बहिरी झाली आहेत. थोडक्यात आपले कसे आहेना! महत्त्वाच्या बातम्या गेल्या खड्यात,आम्हाला काय काहीही चालतं…. फक्त ते मसालेदार, फणफणीत, झणझणीत आणि चटकदार असले पाहिजे.सुशांत आत्महत्या (की खून?) प्रकरण हे त्यातलेच एक..
कोरोना महामारी च्या काळात काम धंदे सोडून घरी लॉक डाऊन झालेल्या जनतेने फक्त कोरोना आणि कोरॉना याच बातम्या पहिल्या असतील.हे मान्य !तरीही सुशांत,कंगना, रीहा यांचा अतार्किक विषय किती चालवावा किंवा चावावा याचे मिडीयाला सुद्धा भान असले पाहिजे.बॉलिवुड चे अंडर वर्ल्ड कनेक्शन हे ओपन सिक्रेट आहे.अंडर वर्ल्ड मधील मुस्लिम गुंडांचे बॉलिवुड प्रेम सर्वश्रुत आहे.त्यामुळे मुस्लिम अंडरवर्ल्ड बॉलिवुड कंट्रोल करते हे कंगना म्हणत असेल तर त्याच्या मिरच्या कुणास आणि का झोंबाव्या? आता सुशांत प्रकरण बिहार निवडणुकांना डोळ्यापुढे ठेऊन कुणी रंगवत असेल तर त्यात शिवसेनेने बिथरण्याचे कारण काय? कारण ते इथेच पाच पन्नास,बिहार मध्ये यांचे अस्तित्व ते किती?बॉलिवुड आणि अमली पदार्थ रॅकेट न समजण्या इतके मुंबई पोलीस खुळचट नाहीत.त्यामुळे ते बाहेर काढल्याने शिवसेनेने अस्मिता वाद उगळण्याची काहीही गरज नाही.पाच पन्नास आमदार असणाऱ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करायला हवे होते.परंतु भाजप द्वेषाचे राजकारण करताना शिवसेना त्यांच्या वैचारिक बैठकीचे श्राद्ध घालून बसली आहे.हिंदुत्व वादी विचारांच्या कट्टर पायावर स्व. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला डोलारा मराठी माणसाला हिंदुत्व जागृत ठेवायला दीपस्तंभ समान भासायचा.बाळासाहेब यांनी शिवसेना स्वकर्तृत्वावर उभी करून दाखवली.त्याकरिता प्रबोधन कारांचे चिरंजीव असल्याची शिदोरी त्यांना उघडावी लागली नाही.विद्यमान मुख्यमंत्री स्वकुटुंबाचा, स्वकर्तृत्वा चा इतिहास विसरले काय?
भिवंडीत निर्घृण पणें मारलेले पोलीस मराठी होते,रझा अकादमी आझाद मैदानात धुडगूस घालत होती तेव्हा तर मुंबई पाक व्याप्त काश्मीर नव्हे तर चक्क पाकिस्तान वाटत होती.पालघर मध्ये हिंदू संतांना ठार मारणाऱ्या निधर्मवादी लोकांना गुपचूप जामीन दिले तेव्हा कुठे होती अस्मिता?आज रणरागिणी चपला घेऊन निघाल्या पण लॉक डाऊन मध्ये पायी जाणाऱ्या माता भगिनींना साधे पाणी पाजायला त्या पुढे नाही आल्या,ही कुठली मराठी अस्मिता?शिवसेना मोहोरम च्या शुभेच्छा मुंबई मधल्या रस्त्यांवर लावू लागली,केम छो? म्हणत निवडणूक लढवू लागली तरी अस्मितेच्या बाता कशा काय करतात बुवा?
प्रत्येक बातमीचे एक मेरिट असते,त्यावर तिचे स्क्रीन लाईफ ठरते. पण सुपाऱ्या घेऊन बातम्या रांगवणारे बेसिक्स विसरलेत,त्यामुळे कधी आणि कुठे काय दाखवायचे याचे सारे नियम फाट्यावर मारले गेलेत.अनेक चांगल्या बातम्या या फालतू धुळवडीत बाजुला राहिल्या.प्रसिद्धी ज्यांना मिळायला हवी त्या बातम्या पहिल्या गेल्याच नाहीत.दुःख याचे आहे की जनतेला माध्यमे गृहीत धरू लागली आहेत.मनोरंजन हेच बातम्यांचे केंद्र बनवून बसलेत,यांना काय काहीही चालते ही भावना वाढीस लागली आहे.शिवसेना – कंगना वाद,संपादक कम प्रवक्ते कम खासदार कम मुलाखतकार यांची वक्तव्ये,सुशांत आत्महत्या या बातम्यांना एक मर्यादा हवी.या बातम्या म्हणजे भारतीयांचे सर्वस्व आहे काय?
Be First to Comment