सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
हजारो वर्षांपासून भारत आणि नेपाळ यांचे सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. ‘हिंदु धर्म’ हा दोन्ही देशांतील समान धागा आहे. साहजिकच दोन्ही देशांतील श्रद्धास्थाने, मान्यता, सण-उत्सव आदींमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आहे.
सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा विश्वभरातील हिंदु समाज वाचक आहे. विविध देशांतील हिंदु नागरिकांचा या संकेतस्थळाला मोठा प्रतिसाद मिळतो. त्यातून काही नेपाळी जिज्ञासूंनी नेपाळमधील हिंदु समाजाला धर्मशिक्षण मिळण्यासाठी सनातनचे संकेतस्थळ नेपाळी भाषेतही चालू करण्याची आग्रही मागणी केली. सनातन संस्था हिंदु धर्मप्रसाराचे व्रत घेऊनच कार्यरत असल्याने आम्ही ती मागणी पूर्ण करत आहोत. विश्वभरातील नेपाळी भाषिकांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी नेपाळी संकेतस्थळ आरंभ करत असल्याची माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सिटी बेलला दिली.
११ ऑगस्ट या दिवशी गोकुळाष्टमीच्या मंगलपर्वावर ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाद्वारे या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’चे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई आणि त्यांच्या धर्मपत्नी, तसेच नेपाळ सरकारमधील माजी राज्यमंत्री सौ. कांता भट्टराई यांच्या हस्ते हे लोकार्पण झाले.
या मंगलप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हेही देहलीहून ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना डॉ. भट्टराई म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे नेपाळी भाषेतील संकेतस्थळ आम्हाला पुष्कळ उपयोगी असल्याचे लक्षात आले. त्याचे पुष्कळ साहाय्य होऊ शकेल. नेपाळमध्ये अशा प्रकारची धार्मिक संकेतस्थळे अल्प आहेत. हे संकेतस्थळ केवळधर्मसंबंधीचे ज्ञानच नाही, तर ‘हिंदु राष्ट्रा’संदर्भात आम्हा सर्वांचे दिशादर्शन करील.’’
या वेळी बोलतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘संकेतस्थळावरील हिंदु धर्मशिक्षण आदी माहितीच्या माध्यमातून भारत आणि नेपाळ या देशांमधील धर्मबंधुत्व दृढ होईल. दोन्ही देशांत चालू असलेली ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची चळवळही पुढे जाईल.’
हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, तामिळ, मल्ल्याळम् या ८भाषांमध्ये असलेले हे संकेतस्थळ आता नेपाळी भाषेतही उपलब्ध झाले आहे. अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ संपर्काची सुविधाही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सनातनच्या संकेतस्थळाद्वारे जिज्ञासूंनी साधनेला प्रारंभ केला आणि स्वत:चे जीवन आनंदी बनवले आहे. तरी अधिकाधिक जिज्ञासूंनी या संकेतस्थळाला भेट देऊन साधनेला आरंभ करावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Be First to Comment