पहिली मंगळागौर….
मौज मजा धम्माल
आज ३३ वर्षे झाली माझ्या पहिल्या मंगळागौरीला!६जून, १९८७ ला ज्येष्ठ मासात आमचे लग्न झाले. मी कोल्हापूर तालुक्यातून एकदम मुंबईत म्हणजे गिरगावात आले. पण पहिले सर्व सण माहेरी त्यामुळे पहिली मंगळागौर आणि नागपंचमी असे जोडून आले. मिस्टर ना रजा नसल्याने मी आणि माझ्या जाऊबाई अस दोघींच आमच्या माहेरच्या गावी आलो. त्या वेळी फोन नव्हते त्यामुळे वडिलांनी पत्राद्वारे निमंत्रण पाठवले. माझे आईवडील, काका काकू आणि माझ्या आजोळ ची सर्व जण खूप हौशी! आईच्या आत्या, आतेबहिण, आईची वहिनी असे बरेच जण माझ्या साखरपुडया पासून सर्व च कार्यक्रमाला यायचे. सर्व पुढे होऊन प्रेमाने करत. मंगळागौर आणि सत्यनारायण अशा दोन पूजा एकाच दिवशी ठेवल्या. आई वडिलांनी छान तयारी केली होतीच. बहिणीचीही तयारी बरीच झाली होती. मी घरी गेल्या पासून सोबत जाऊबाई आल्याने त्यांचा ही मान पान केला. घरं छोटी होती पण मन मोठी होती. श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंती आणि अगत्य यामुळे सर्व छान पार पडले. पूजेला आम्ही चौघी जणी होतो. फुल पत्री भरपूर आणली होती. त्यामुळे दोन्ही पूजा सुंदर च झाल्या. दुपारी पुरणा वरणाचा खीर व इतर स्वयंपाक सत्यनारायणाचा प्रसाद असे बरच केले होते. मंगळागौर कहाणी, आरत्या मग महानैवेद्य! जेवताना मंगळागौरी च्या वसा (वशेळ्या)नी बोलायचे नसे. पण एकदा तरी मी बोलेन म्हणून प्रयत्न खूप केले. पण मी काही दाद दिली नाही. मौन पाळून जेवण संपवले. संध्याकाळी बायकांना हळदीकुंकू दिले घेतले. उखाणे कार्यक्रम.. तो पर्यंत परत फराळाची लगबग.! येणाऱ्या ना माझ्या बरोबर बोलावे ही इच्छा! हसत खेळत फराळ झाले. मग मुख्य मंगळागौरीचे खेळ. पण पुण्या मुंबई सारखे तिकडे खेळ प्रकार खेळत नसत. उखाणे, पिंगा, फुगडी, गोफ असेच खेळ झाले. मग गप्पा, चेष्टा मस्करी अगदी पहाटे पर्यंत सर्वजणी उत्साहाने जागवली आरती केली. आणि आई वडिलांना वाण देऊन माझी मंगळागौर अशी आठवणीतील झाली. आज इतक्या वर्षांनी परत ते क्षण डोळ्यासमोर आले. माझ्या मुलीचीही मंगळागौर मी अशीच कौतुकाने केली होती. आज पाचव्या वर्षी माझ्या लेकीच्या मंगळागौरीचे उद्यापन संपन्न होत असताना डोऴ्यासमोर तेहत्तीस वर्षांपूर्वीच्या स्मृती जागृत झालेल्या आहेत. तेवढ्याच उत्साहाने आणि कौतुकाने सर्व सोहळा करायचे योजलेले पण हे कोरोनाचे संकट! असो! महामारीमुळे बंधने आली आहेत खरी! पण ती आपल्या साठीच आहेत. तेव्हा तूर्तास या आठवणी कुरवाळत बसणे हेच आपल्या हाती. पण नाव घेणाऱ्यांनी मात्र खालील उखाणे ध्यानी ठेवा..
सॅनिटाईज करा हात तुमचे
बरेच वेळा…
नवऱ्याचे नाव घेते मास्कचा नियम जरुर पाळा
छाया कुलकर्णी, खांदा कॉलनी
Be First to Comment