चाकरमान्यांचा निकाल
सिटी बेल लाईव्ह / दादर #
चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी मनसेने उपलब्ध केल्या गाड्या
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेनं विशेष बस सेवा सुरु केली आहे. कोकणातील गणेशभक्तांना गावाकडे जाण्यासाठी राज्य सरकार कोणतीही सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप मनसेनं केला होता. त्यापार्श्वभूमीवर मनसेनं बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मनसेनं आपला शब्द पाळला आहे. चाकरमान्यांसाठी मनसेची गणपती स्पेशल बस सेवा आजपासून सुरू झालीय. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमावलीमुळं यंदा गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कोंडी झाली होती. रेल्वे आणि एसटी बस सेवा बंद असल्यामुळं कोकणातील चाकरमान्यांना गावी पोहोचणे कठीण झाले होते.राज्य सरकारही याबाबत तातडीने काही निर्णय घेत नसल्यानं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या वतीने कोकणात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. यासाठी बुकिंगची तारीखही जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, १ ऑगस्टपासून बुकिंग सुरू करण्यात आलं होतं. त्यानुसार आज बस सोडण्यात आल्या.
गणेशोत्सवानिमित्त लोकांना कोकणात सोडण्याची जबाबदारी खरंतरं राज्य सरकारची होती. त्यांनी ती योग्य पद्धतीनं पार न पाडल्यामुळं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभम्र होता आणि नाराजी देखील होती. त्यामुळे मनसेनंच हा पुढाकार घेऊन उपक्रम राबवला असून शहरातील विविध भागांतून अशा बस कोकणासाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली.
या प्रवासासाठी मनसेनं पॅसेंजर सेफ्टी कीट बनवलेत. यामध्ये फेस मास्क, हँड ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर, बेडशीट यांचा समावेश आहे. तसंच सुमारे अडीचशे बसेसपैकी आज २५ टक्के बसेस दिवसभरात विविध वेळांमध्ये सोडण्यात येणार आहेत. आज १० ते १५ बसेस दादरवरुन सोडण्यात आल्या आहेत. तर काही बसेस या ठाणे, भांडूप आणि इतर भागातून सोडण्यात येणार आहेत. ५० प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमधून निम्म्याच प्रवाशांना जाता येणार आहे. चिपळून, महाडपासून कणकवली-सावंतवाडीपर्यंत या बसेस जाणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
Be First to Comment