Press "Enter" to skip to content

खिडूकपाडा च्या समस्या सुटणार

प्रभुदास भोईर यांच्या प्रयत्नांना यश : सिडको शिष्टमंडळाच्या पाहणी दौऱ्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत

सिटी बेल ∆ कळंबोली ∆

भीमशक्ती संघटना आणि रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून सिडकोचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आंदोलन येत्या दहा तारखेला आयोजित केले होते. या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर करत शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी राज्य माथाडी कामगार संघटनांची पूर्ण ताकद देखील या आंदोलनात घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली होती. प्रभुदास भोईर यांच्या आंदोलनाच्या खणखणीत इशाऱ्यानंतर सिडको प्रशासन वठणीवर आले. सिडको प्रशासनाने तातडीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये ठरल्यानुसार सिडकोच्या शिष्टमंडळाने मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी खिडुकपाडा येथील भेडसावणाऱ्या समस्या तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणची पाहणी केली.

भीमशक्ती संघटना आणि रिपब्लिकन सेना यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड हे या समस्यांचा गेली पाच वर्षे पाठपुरावा करत आहेत. आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना ते म्हणाले की, तब्बल चार वर्षांपूर्वी आंबेडकर भवनांचे उद्घाटन संपन्न झाले होते. सर्व सुविधांनी युक्त हे भवन सिडको ने निर्माण केले असले तरी देखील गेली चार वर्षे ते नागरिकांकरता खुले करण्यात आले नाही. आम्ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर आमच्या मागणीची दखल घेतली गेली आहे आज केलेल्या पाहणी दौऱ्यानुसार जरी हे भवन पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले असले तरी देखील ते जसे होते तसे करून देण्याची जबाबदारी सिडको च्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे.

खिडुकपाडा हे सिडको प्रकल्पग्रस्तांच्या 95 गावांपैकी असे गाव आहे ज्याच्या सीमा सिडकोने अधोरेखित केलेल्या आहेत. ग्रामस्थांवर सीमा निर्मितीचे निर्बंध लादणाऱ्या सिडको ने या ठिकाणी एक टक्क्याची देखील नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. येथील ग्रामस्थ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत असल्याचे प्रभुदास भोईर यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये विसर्जन तलाव स्वच्छता आणि विसर्जन घाटाची निर्मिती, जे ब्लॉक रस्त्याचे काँक्रिटीकरण, मुलांना खेळण्यासाठी मैदान, ग्रामस्थांच्या सार्वजनिक कार्यक्रमांकरिता समाज मंदिराची निर्मिती यांचा समावेश होता. या साऱ्या ठिकाणांची सिडकोच्या शिष्टमंडळाने पाहणी केलेली असून सकारात्मक अहवाल देणार असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले. सिडको शिष्टमंडळाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल येथील ग्रामस्थांच्या सुविधा मिळण्याच्या आशा पल्लवीत झालेले आहेत.

सिडकोच्या वतीने दीपक हरताळकर, अतिरिक्त मुख्य अभियंता (1),ए टी अनुसे, अधीक्षक अभियंता पनवेल व कळंबोली,विलास बनकर, कार्यकारी अभियंता कळंबोली,शारदा फडतरे वरिष्ठ नियोजनकार दक्षिण प्रशांत बनकर,सहाय्यक कार्यकारी अभियंता कळंबोली आणि प्लॅनिंग सेक्शन च्या अपूर्वा मॅडम यांनी पाहाणी केली.तर सिडको अधिकाऱ्यांच्या पहाणी दौऱ्याच्या वेळेस शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका क्षेत्र प्रमुख रामदास शेवाळे, काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर, सुभाष गायकवाड,जिवन गायकवाड, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेशशेठ भोईर
आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.