आज नऊ ऑगस्ट. ऑगस्त क्रांतिदिन.
आठ ऑगस्ट रोजी गोवालिया टॅंक (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान .. ग्रॅन्टरोड स्टेशन जवळ) मुंबई येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्यात महात्मा गांधींनी ‘करेंगे या मरेंगे’ आणि ‘चाले जाव’ या दोन महत्वाच्या घोषणा केल्या. त्याच रात्री ब्रिटीशानी सर्व काँग्रेस नेत्यांची धरपकड केली. त्यामुळे काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी लढ्याची धुरा आपल्या खान्द्यावर घेतली. या लढ्याची सुरुवात म्हणून अरुण असफअली या झुंझार तरुण महिला नेत्याने कामगाराच्या वेशात खूप बंदोबस्त असलेल्या गोवालिया टॅन्कच्या मैदानात प्रवेश केला. तेथे तिरंगा फडकावून अरुण असफअली तेथून कोणाला काही कळायच्या आत पसारही झाल्या. या रोमहर्षक घटनेने या ऑगस्ट क्रांतीची सुरुवात झाली.
जयप्रकाश नारायण, एस. एम. .जोशी, अच्युतराव पटवर्धन, युसूफ मेहर अली आणि अरुण असफ अली हे पाच नेत्यांनी या क्रांतीचे नेतृत्व केले. आजवर झालेल्या काँग्रेसच्या लढ्यांपेक्षा हा लढा वेगळा होता. हा लढा केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने नाही, तर बॉम्बगोळे आणि अन्य साधने वापरून लढला गेला. साताऱ्यात नाना पाटलांनी ‘प्रति सरकार’ स्थापन करून देशाला एक वेगळी दिशा दिली. जागीजागी ब्रिटिशांचे सरकारी खजिने लुटून या क्रांतीसाठी पैसे जमविले गेले. आधी काह वर्षे असहकाराच्या चळवळीच्या माध्यमातून गांधीजींनी एक ताकद काँग्रेसमागे उभी केली होती त्यामुळे या लढ्याला सामान्य माणसांचा पाठिंबा मिळाला. भूमिगत क्रांतीकारकांना राहण्यासाठी/लपण्यासाठी सामान्य माणसांनी मदत केली. सिंगापूरमध्ये स्थापन झालेल्या आझाद हिंद सेनेला याच सुमारास सुभाष चंद्र बोस यांच्यासारखे झुंजार नेतृत्व लाभले. यामुळे भारतातील क्रांतिकारकांचा उत्साह दुणावला. माथेरानच्या डोंगरावर भाई कोतवाल यांनी मोठा लढा उभारला होता. नंदुरबारला शिरीषकुमारसारखे कोवळे युवक धैर्याने ब्रिटिशांना सामोरे जात होते.
ठाण्यात रेल्वेच्या पारसिक बोगद्यात बॉम्बस्फोट करून रेल्वे वाहतूक बंद करण्याचा क्रांतिकारकांचा प्रयत्न होता. कळव्यातील कावेरीताई पाटील तसेच खारेगावमधील ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांचे काका या कटात सामील होते. परंतु फितुरीमुळे पोलिसांना याची खबर लागली आणि हा कट फसला.
काही काळाने या क्रांतीमधील जोर ओसरू लागला होता. परंतु मुंबईतील गोदीत नाविकांनी क्रांतीचा झेंडा उभारला. आणि ब्रिटिश नामोहरम झाले. लवकरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
ऑगस्ट क्रांतीच्या थोर क्रातिकारकांना प्रणाम !






Be First to Comment