Press "Enter" to skip to content

पनवेल प्रवासी संघाच्या आंदोलनास भरघोस प्रतिसाद

पनवेल एसटी स्टँड मधील संकुल उभारणीबाबत पंधरा दिवसात एसटी प्रशासनासोबत होणार बैठक

कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलन स्थळी येऊन दिले आश्वासन

सिटी बेल ∆ पनवेल ∆

एक हाक प्रवाशांच्या सेवेसाठी असे म्हणत पनवेल प्रवासी संघाने एसटी स्थानकातील संकुलाच्या रखडलेल्या कामास त्वरित सुरुवात करावी या मुख्य मागणीसाठी आज गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. प्रवासी, सेवाभावी संघटना, आणि बहुतांश राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात हिरीरीने सहभागी होऊन एसटी स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी आग्रही मागणी केली. भरघोस प्रतिसाद लाभलेल्या आंदोलनाची दखल घेत एसटी प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंते व विभागीय अभियंते यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि आगामी १५ दिवसात प्रकल्पास प्रारंभ करण्यासंदर्भात प्रशासनासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तर आगामी तीस दिवसात प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्यास आंदोलनाची धार तीव्र करणार असल्याचे पनवेल प्रवासी संघाच्या वतीने सांगण्यात आले.

पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्ती कुमार दवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या देखरेखीखाली आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.२००९ साली राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकातील मुख्य इमारत धोकादायक असल्याचा ठपका ठेवत पाडण्यात आली. त्यानंतर बांधा व हस्तांतरित करा या धर्तीवरती उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पाच स्थानकांमध्ये पनवेल स्थानकाची निवड केली गेली.२०१८ साली या प्रकल्पाकरिता मान्यता प्राप्त झाली. परंतु जुने संकुल पाडल्यानंतर 14 वर्षे उलटून गेली आहेत पण अद्यापही प्रत्यक्ष कामास सुरुवात नाही.तब्बल १४ वर्षे या कामाचा पाठपुरावा करणाऱ्या पनवेल प्रवासी संघाने प्रत्यक्ष कामास सुरुवात होत नसल्याचे पाहून आंदोलनाचे संविधानिक हत्यार उपसले. पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ भक्ती कुमार दवे, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, सचिव श्रीकांत बापट, निलेश जोशी हे आंदोलन स्थळी धरणे देण्यासाठी स्थानापन्न झाले होते.

कोकण शिक्षक मतदार संघाचे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे आमदार बाळाराम पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक तथा शेकापनेते जे एम म्हात्रे,रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, शिवसेनेचे सल्लागार तथा प्रवक्ते बबनदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, शिवसेनेचे पनवेल शहर जिल्हा प्रमुख शिरीष घरत, शेका पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघ अध्यक्ष काशिनाथ पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी,काँग्रेस चे पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल चे सभापती दत्तात्रय पाटील, माजी सभापती मोहन कडू,ज्येष्ठ नेते जी आर पाटील, एड.के एस पाटील, नगरसेवक रवींद्र भगत, काँग्रेस पक्षाच्या पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे, माजी नगरसेविका शशिकला सिंग, शिवसेना नेते शिरीष बुटाला, शिवसेनेचे पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव,श्रुती शाम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सुनील मोहोड,पनवेल युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश जाधव,विश्वास पेटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कामगार सेल उपाध्यक्ष अमित लोखंडे,आदी राजकीय प्रभूतींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी देखील पनवेल प्रवासी संघाच्या आंदोलनाला भरघोस प्रतिसाद दिला. पनवेल संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार कांतीलाल कडू यांनी प्रकल्प रखडविल्या साठी आमदार आणि खासदार अशा लोकप्रतिनिधींवर प्रखर शाब्दिक आसूड ओढले, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ते आणि त्यांची संस्था डॉक्टर भक्ती कुमार दवे आणि पनवेल प्रवासी संघाच्या सोबत असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. ९५ गाव संघर्ष समिती चे अध्यक्ष ऍड सुरेश ठाकूर, सरचिटणीस सुधाकर पाटील,सिटीझन युनिटी फोरम च्या रंजना सडोलीकर, सुरेश सडोलिकर जनजागृती ग्राहक संरक्षण मंच चे रायगड जिल्हा अध्यक्ष काशिनाथ जाधव, पनवेल तालुका अध्यक्ष बी पी म्हात्रे, खारघर फोरम च्या लीना गरड यांच्यासोबतच निवृत्त सेवक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, बहुजन समाज पार्टी,आदिवासी सेवा संघ अशा संघटनांनी आंदोलनात सहभागी होऊन त्यांचा पाठिंबा दर्शविला.

आंदोलनाच्या सुरुवातीला डॉक्टर भक्ती कुमार दवे यांनी प्रास्ताविक सादर केले. पनवेल प्रवासी संघ करत असलेल्या पाठपुराव्या बाबत उपस्थितांना अवगत करत त्यांनी आंदोलना पाठीमागची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे अंति सुदाम पाटील यांनी पाठिंबा देणाऱ्यांचे, सहभागी होणाऱ्यांचे आणि आंदोलनाचे नियोजन करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

एसटी प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता विजय रेडेकर, विभागीय अभियंता विजय सावंत यांनी आंदोलन स्थळी येऊन पुढील पंधरा दिवसात स्थानक संकुल उभारणी बाबत प्रवासी संघ आणि एसटी प्रशासन यांच्या दरम्यान बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले.

पनवेल प्रवासी संघांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी रायगड आणि मुंबईला जोडणाऱ्या पनवेल बस स्थानकाचा प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेला विषय मार्गी लावण्याच्या उद्देशाने आज धरणे आंदोलन केले. पनवेलकरांचे ही अभिनंदन करतो कारण पनवेलमधील राजकीय पक्ष, सेवाभावी संघटना आणि सर्वसामान्य पनवेलकर यामध्ये उपस्थित राहिले. एसटीच्यावतीने कार्यकारी अभियंता रेडेकर यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडे पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे प्रवासी संघाकडून त्यांना असे सांगण्यात आले की ८ दिवसाचा वेळ घ्या आणि याबाबतीतील वस्तुस्थिती तपासून त्याबाबतची माहिती आमच्यापर्यंत सुपूर्त करा. डीसायडिंग ऑफिसर सोबत बसून याबद्दलचा निर्णय घेऊया. १९ डिसेंबर पासुन अधिवेशन सुरू होत आहे याचीही जाणीव करून दिली. जे करणार असाल तेच बोला आणि जबाबदारीने बोला, इथे आश्वासनं देऊन ती पूर्ण न केल्यास तुमच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका. पनवेलकरांनी केलेल्या या आंदोलनाची दखल मी येत्या अधिवेशनात घेणार आहे. याबद्दलच्या सूचना मी माझ्या कार्यालयात देत आहे. हा प्रश्न परिवहन मंत्री, परिवहन सचिव, एसटीचे चेअरमन यांच्या समवेत चर्चेच्या माध्यमातून आणि वैधानिक पातळीवर दोन्ही बाजूचा वापर करीत तातडीने मार्गस्थ व्हावा म्हणुन मी प्रयत्न करणार आहे.
– आमदार बाळाराम पाटील

प्रवासी संघांचे हे धरणे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जवळपास यशस्वी झाले आहे. आमच्यासोबत आमदार आणि बाकी सगळ्या पक्षाचे नेते आणि पनवेलकर आहेत. पनवेलकरांच्या सोयीसाठी आजपासून ही सगळी मंडळी कटिबध्द राहणार आहेत. कार्यकारी अभियंता रेडेकर यांनी ८ दिवसाचा वेळ घेतला असून त्यानंतर बैठक घेणार आहेत. यामध्ये काही महत्वाच्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगुन हे काम करून घेतल्यास हा प्रकल्प पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही असे मला वाटते. राजकीय इच्छाशक्ती आणि शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये विसंगती आहे का? प्रशासनाच्या बाबतीत जेवढी सत्ताधाऱ्यांची मदत लागते तेवढी मदत होत आहे की नाही हे देखील तपासून बघण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती पाहता काम होण्यास विलंब होतो आणि कामांची किंमत वाढते. परिणामी त्याचा भार नागरिकांवर पडतो याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे असे मला वाटते.
– डॉ.भक्तीकुमार दवे, अध्यक्ष-पनवेल प्रवासी संघ

‘एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी’ असे म्हणत पनवेल प्रवासी संघाने पनवेल एसटी स्थानकातील संकुल उभारणीचे काम तातडीने सुरू झाले पाहिजे यासाठी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात सर्व राजकिय नेतेमंडळी, सामाजिक संघटना, पनवेलकर नागरिक यांच्यासह आदींनी सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आज जरी एसटी प्रशासनाने बैठकीचे आश्वासन दिले असले तरीदेखील हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहणार आहे. या संघर्षात आपण अशीच आपली मोलाची साथ आम्हाला द्याल यात माझ्या मनात जराही दुमत नाही. पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
– अभिजीत पाटील, कार्याध्यक्ष- पनवेल प्रवासी संघ

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.