कोरोनाने मोडले अनेकांचे श्रावण : चिकन-मटणच्या दुकानांतील गर्दी कायम
करोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे प्रयत्न
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
करोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी प्रथीनेयुक्त आहार करण्याचा सल्ला पाळण्यासाठी अनेकांनी श्रावणातील मांसाहार बंदीवर पाणी सोडले आहे. दररोजच्या जेवणात अंडींचे सेवन करण्यासोबतच चिकन, मटण, मासळीयुक्त आहाराकडेही नागरिकांचा कल कायम आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा श्रावण महिना सुरू असतानाही व्यवसायात फारशी घट नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
श्रावण महिना सुरू होताच अनेकजण मांसाहार सोडून फक्त शाकाहाराचा अवलंब करतात. त्यामुळे चिकण, मटण आणि मासळीची मागणी कमी झाल्याने त्याचे दरही कमी होत असतात. मात्र, यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेकांनी श्रावणावर पाणी सोडले आहे. करोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे ग्राहक सांगत आहेत. शहरात रविवार, बुधवार आणि शुक्रवारी मासळी बाजार तसेच मटण-चिकण, मासळीला मागणी कायम आहे. त्यातही अधिक प्रथिने देणाऱ्या चिकनला अधिक मागणी आहे.
श्रावण महिन्यात मागणी घटल्याने कोंबडी तसेच अंडय़ाच्या दरात घसरण होते. मात्र, यंदा ती परिस्थिती नाही. सध्या ठाण्यात ब्रॉयलर कोंबड चिकन २०० तर जिवंत १२० रूपये प्रतिकिलोने दराने विकली जात आहे. तर, अंडे प्रति नग १२ रुपयाने विकले जात आहे. ग्राहकांकडून मागणी कायम असल्याने दरही कमी झाले नाही.
नरेश भोईर,
चिकन विक्रेते
करोनाकाळात नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांचा कल श्रावणातही मांसाहाराकडे कायम आहे. मांसाहारामुळे नागरिकांना प्रथिने मिळतात. त्यातही अंडय़ांमध्ये उत्तम प्रथिने असतात. त्यासोबतच जीवनसत्त्वही शरिराला आवश्यक आहेत. त्यामुळे नागरिकांनी मांसाहारासोबत हिरव्या पालेभाज्याही खाव्यात. प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळाल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Be First to Comment