Press "Enter" to skip to content

पनवेल बसस्थानकासाठी आता आरपारची लढाई

हे तर… आमदार प्रशांत ठाकूर यांचे राजकीय अपयश : जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभिजीत पाटील यांचा घाणाघात

पनवेल एसटी स्थानक मृत अवस्थेत पोहोचले – डॉ. भक्तिकुमार दवे

सिटी बेल ∆ पनवेल ∆

पनवेल बसस्थानक आता शेवटची घटका मोजत नाही तर मृत अवस्थेत पोहोचले असून पनवेल बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी आता आम्ही आरपारची लढाई लढण्यास सज्ज आहोत असा निर्वाणीचा इशारा आज पनवेल प्रवासी संघाने पनवेलमधील काॅंग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी बोलताना पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्तीकुमार दवे म्हणाले की, राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांचे पनवेल स्थानक हे प्रवासी नागरिकांकरता डोकेदुखी ठरत आहे.चार एकर विस्तीर्ण प्रदेशावर वसलेले एसटी स्थानक प्रवाशांना सुविधा देण्याच्या बाबतीत मात्र कमालीचे निष्क्रिय वाटते. या स्थानकामधील मुख्य इमारत धोकादायक परिस्थितीत असल्याकारणामुळे पाडली गेली. परंतु अनेक परवानग्या आणि अनुमत्या यांच्या लाल फितीच्या कारभारात नवीन इमारतीचे बांधकाम आजही अडकलेले आहे.

पाडलेल्या मुख्य इमारतीच्या ठिकाणी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे बांधा आणि हस्तांतरित करा असे स्थानक बनविण्याचा एस टी मंडळाचा मानस आहे. तूर्तास अशा प्रकारचे स्थानक सिन्नर येथे उभारले आहे. सिन्नर मधील प्रोजेक्ट हा पायलट प्रोजेक्ट म्हणून पूर्ण केला गेला. पण त्यानंतरचा बीओटी तत्त्वावरचा पनवेलचा प्रकल्प मात्र रखडलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यात अशा प्रकारचे पाच प्रकल्प राबविण्यात येत आहेत त्यात पनवेल समाविष्ट आहे.२०१८ या सली अनुमती प्राप्त झालेली असून देखील अद्यापही विटेवर वीट रचण्यात महामंडळाला अपयश आला आहे. सध्या डेपो मॅनेजर, कंट्रोलर,लेखापाल, अधिकारी ज्या इमारतीत आहेत ती इमारत देखील भयावह परिस्थितीत आहे. येथील कर्मचारी वर्ग अक्षरशः जीव मुठीत घेऊन काम करत असतो. चालक,वाहक यांच्या निवारा घ्यायच्या खोल्या मोडकळीस आल्या आहेत. स्थानकातील एकमेव शौचालयावरती सारा ताण येत असल्याकारणाने तेथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असते. मुख्य निवारा शेड आणि अन्य दोन निवारा शेड्स चे पत्रे पावसाळ्यात गळत असतात, अस्वच्छ परिसर हा प्रवाशांच्या पाचवीला पुजलेला असतो. स्थानकामधील भिमकाय खड्डे प्रवाशांची हाडे खिळखिळी करतात.ठाणे,मुंबई,नवी मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तर निवारा शेड सुद्धा उपलब्ध नाही.

कोकण आणि मुंबई या दोन विभागांना जोडणारे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानक म्हणून पनवेल अधोरेखित झालेले आहे. 4000 बस गाड्यांची येजा असणाऱ्या या स्थानकात सुविधा मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत.

या साऱ्या पार्श्वभूमीवर पनवेल प्रवासी संघ करत असलेल्या पाठपुराव्याची पत्रे व त्यांचा घटनाक्रम आम्ही प्रसिद्धी माध्यमांना सादर करत आहोत. मागच्याच आठवड्यात आमच्या शिष्टमंडळाने महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्रीमती भिलारे यांच्याशी चर्चा केली.कोरोना विषाणू ने दोन वर्षे प्रकल्प थांबविला असे गृहीत धरून तेवढा कालखंड पुणे केला तरी देखील अनुमती प्राप्त झाल्यानंतर दोन ते तीन वर्षात सुद्धा प्रकल्प का नाही सुरू होऊ शकला असा जाब विचारला असता, सदरच्या प्रकल्पामध्ये तीन गोष्टींचा अंतर्भाव नव्याने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग पॉइंट, सी एन जी रिफिलिंग पंप, आणि मल्टी लेवल पार्किंग या सुविधा अतिरिक्त पद्धतीने अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यामुळे मूळ नकाशा नियोजनात बदल करावे लागले आहेत. सदरची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे श्रीमती भिलारे यांनी आमच्या श्रेष्ठ मंडळास सांगितले आहे. परंतु सदरचे आश्वासन पूर्ण न झाल्यास आता पनवेल बसस्थानिकासाठी आम्ही आरपारची लढाई करण्यासाठी सज्ज आहोत असा इशारा देखील डॉक्टर भक्तीकुमार दवे यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी श्रीकांत बापट – सचिव पनवेल प्रवासी संघ, यशवंत ठाकरे – उपाध्यक्ष पनवेल प्रवासी संघ, निलेश जोशी – सदस्य पनवेल प्रवासी संघ, अभिजीत पाटील – झेड आर यु सी सी मेंबर तथा पनवेल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उपस्थित होते.

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेल प्रवासी संघाच्या कामामध्ये मदत करत आले आहेत हे मान्यचं आहे. परंतु आपल्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात पनवेल बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन देऊन देखील गेल्या पंधरा वर्षात ते हा प्रश्न निकाली लावू शकले नाहीत. परिणामी पनवेल बस स्थानकाची झालेली दुरावस्था समस्त पनवेलकर पाहतच आहेत. हे आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांचे राजकीय अपयशचं म्हणावे लागेल ! ‌ ‌– अभिजीत पाटील, ‌ पनवेल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.