भर पावसामध्ये गाडीत बसलेल्या भारत गणेशपुरे यांच्या हातातून हिसकावला मोबाईल
सिटी बेल लाइव्ह / मुंबई :
‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांना मुंबईतील हायवेवर एका वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. भर पावसात, ट्रॅफिक झालेली असताना एका टोळीने मदतीचं नाटक करत त्यांचा मोबाईल चोरला. स्वतः भारत गणेशपुरे यांनीच आपला हा थरारक अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तसेच सर्व नागरिकांना असं काही घडलं, तर सावध राहण्याचं आवानह त्यांनी केलं. त्यांनी आपले अनुभव सांगणारा व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट केला आहे.
भारत गणेशपुरे म्हणाले, ‘आज माझा मोबाईल अक्षरशः लुटून नेला आहे.ही घटना कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या फ्लाय ओव्हरवर घडली. काल दरड कोसळल्यामुळे तेथे खूप पाऊस होता, खूप ट्रॅफिक होती. त्यावेळी दोन माणसं आली आणि त्यांनी खूप विचित्र पद्धतीने माझी गाडी ठोठावली, मात्र तरीही मी काच उघडली नाही. मात्र, माझ्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माणसाने कारचा दरवाजा उघडला. त्याक्षणी त्या व्यक्तीने ओकारी काढण्याचं नाटक केलं. त्याचवेळी माझ्या बाजूने एक माणूस आला आणि काच वाजवली. मी त्याच्याकडे पाहिलं, तर तितक्यात ओकारी काढणाऱ्या माणसाने माझा मोबाईल चोरुन नेला.’
‘तुम्हाला कुणी निर्दयी म्हटलं तरी गाडीची काच उघडू नका’
‘माझ्यासोबत ही घटना घडली आहे. मात्र, तुम्ही सतर्क राहा. सध्या कोरोनाची स्थिती आहे. कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुमच्यासोबत अशापद्धतीची घटना घडली तर आधी तुमची गाडी बंद (लॉक) करा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटलं तरी चालतंय. दिवस वाईट आहेत. या प्रकारात बायका, मुलं, लहान मुलं अशी टोळी असते,’ असं गणेशपुरे यांनी सांगितलं.
पीछे का काच खुला है, टायरमध्ये हवा नाही, तुमच्या गाडीत स्पार्क होतोय यावर विश्वास ठेऊ नका
गणेशपुरे म्हणाले, ‘पीछे का काच खुला है, मागच्या टायरमध्ये हवा नाही, समोरुन तुमच्या गाडीत स्पार्क होतेय, असे अनेक प्रकार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या गाडीखाली उतरु नका. सुरक्षित ठिकाणी आल्यावर हे पाहा. फारफार तर त्या गाडीचा टायर खराब होईल. इतकंच होईल, बाकी काही होणार नाही. त्यामुळे काळजी घ्या. माझा स्वतःचा मोबाईल माझ्या मुर्खपणामुळे गेला. त्या टोळीने माझ्या गाडीतून माझा मोबाईल लुटूनच नेला.’
‘मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी मला मदत करण्याचा आश्वासन दिलं आहे. पण तुम्ही काळजी घ्या,’ असं आवाहन भारत गणेशपुरे यांनी केलं.
Be First to Comment